23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरपहिल्याच दिवशी गृह मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी गृह मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाला दि. २ मेपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. गृह मतदानासाठी घरी येणा-या मतदान पथकांचे आभार मानत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील मतदारांनी आपला हक्क बजाविला. वयोवृद्धता, दिव्यांगत्व यामुळे मतदान केंद्रावर जाणे शक्य होऊ शकले नसते, मात्र गृह मतदान सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद यावेळी अनेकांच्या चेह-यावर झळकला.
८५ वर्षांवरील १ हजार ८९३ आणि ४६३ दिव्यांग मतदार असे एकूण २ हजार ३५६ मतदार गृह मतदानासाठी पात्र ठरले. या मतदारांचे घरोघरी जावून मतदान करून घेण्यासाठी १३० मतदान पथके स्थापन करण्यात आली. लातूर शहरातील औसा रोड परिसरातील श्रीमती गोदावरी कुलकर्णी यांचे वय १०१ वर्षे, येथील लेबर कॉलनी येथील १०४ वर्षे वयाच्या अहेमद खुदबोद्दिन शेख, याच परिसरात राहणा-या ८७ वर्षीय किसनाबाई ताकपिरे यांनीही मतदान पथकाने घरी येवून आपले मतदान करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR