लातूर : प्रतिनिधी
पावसाळ्यापुर्वीची एप्रील, मे महिन्यात करावयाची नालेसफाई मनपाने जरी कागदोपत्री सुरू केली असली तरी ती प्रत्यक्षात मात्र अद्याप सुरू केली नसून रविवारी दुपारी झालेल्या अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या बे मोसमी पावसात पावसाचे पाणी जुना औसा रोड व शहरातील अनेक रस्तयावर तुंबलेल्या न्याल्यातून आल्याने रस्तयांना अक्षरश: गटाराचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले. तर या पहिल्याच बे मोसमी पावसाने मनपाचे नाले सफाईचे पितळ उघडे पाडल्याचे तसेच दुृर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिक मार्ग काढावा लागल्याचे चित्र ही पहावयास मिळाले.
शहरातील बहुतेक वसाहतींतून नाल्या बांधण्यात आल्या असून या वेळीच नाल्यांची साफसफाई न केल्यास आसपासच्या परिसरात राहणा-या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ येते. दरवर्षी तुंबलेल्या नाल्यांमुळे वसाहतींत पाणी जाण्याचे प्रकार तर घडतातच, पण नाल्यात असणा-या कच-यामुळे रोगराईचे प्रमाण झपाट्याने वाढते. दरवर्षी जूनच्या प्रारंभी एप्रील मे महिन्यात महापालिका नाल्यांची सफाई करत असते. काही विशिष्ट ठेकेदारांनाच ही कामे पुरवली जातात. थातूरमातूर कामे करून नाल्यातील कचरा काठावरच टाकून हे ठेकेदार काम उरकतात. फोटो काढून सादर करत बिले उचलतात. ही आजपर्यंतची परंपरा मनपात आहे.
यंदा नालेसफाईसाठी मनपाने कोट्यावधी रुपयांची तरतूद ही अर्थसंक्लपात केली आहे. मात्र अजून तरी शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. रविवारी दुपारी झालेल्या अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या बे-मोसमी पावसात पावसाचे पाणी जुना औसा रोड व शहरातील अनेक रस्तयावर तुंबलेल्या न्याल्यातून आल्याने रस्तयांना अक्षरश: गटाराचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले. तर या पहिल्याच बे-मोसमी पावसाने मनपाचे नाले सफाईचे पितळ उघडे पाडल्याचे तसेच दुृर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिक मार्ग काढावा लागल्याचे चित्र ही दिसून आले.