कराची : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची मागणी सुरू झाली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसावर निर्बंध आहेत, तर दूतावासातील अधिका-यांनाही परत जाण्यास सांगितले आहे. अटारी सीमेवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे म्हणणे आहे की, या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. पण पाकिस्तानचे प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे.
इश्तियाक अहमद म्हणाले की, हा कसला योगायोग आहे की काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध द्वेष व्यक्त केला आणि त्यानंतर असा हल्ला झाला, यामध्ये निष्पाप लोक मारले गेले. जगात पाकिस्तानची विश्वासार्हता आधीच शून्य आहे. आता आलेख शून्याच्या खाली जाईल, असा घरचा आहेर प्रोफेसर इश्तियाक अहमद यांनी पाकिस्तानला दिला.
इश्तियाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत असे म्हणण्याची काय गरज होती. पाकिस्तानमध्येच अशांतता असताना त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर भर दिला. ते स्वत:ला भारत आणि हिंदूंपेक्षा वेगळे म्हणवतात, पण त्यांचा चीनशी काय संबंध आहे?, असा सवालही त्यांनी केला.
‘चीन आपला काका वाटतो का?’ ते नास्तिक आहेत. तिथे इस्लामचा नाश होत आहे. तुम्ही तिथे गप्प आहात, पण तुम्ही पाकिस्तानला पुन्हा अडचणीत आणले आहे. आमच्यासारख्या लोकांना वाटते की, व्यापारी मार्ग उघडले पाहिजेत आणि भारतापासून मध्य पूर्वेकडे व्यवसाय सुरू झाला पाहिजे, असंही प्राध्यापक इश्तियाक अहमद म्हणाले.