28 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूर‘पाणपोयी’ संवेदनशीलच नव्हे तर समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

‘पाणपोयी’ संवेदनशीलच नव्हे तर समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्­लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मातृत्वाच्या भावनेतून त्यांच्या राज्यामध्ये पशु व मानवासाठी पाण्याची सोय केली. आजदेखील पशुंसाठी पाणपोई हे अत्यंत अतिआवश्यक असा उपक्रम आहे. लातूर शहरातील समाज बांधवांनी अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने पशुंसाठी पाणपोई चालू केली आहे. हे संवेदनशीलच नव्हे तर समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम आहे, अशा उपक्रम समाज घटकातील सर्वांनी कृतीत आणावे असे आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांनी केले.
पुण्यश्­लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवानिमित्त लातूर येथील सामाजीक कार्यकर्ते धनराज माने व त्यांच्या सहकार्याने  जिल्ह्यामध्ये ३०० पाणपोई चालविण्याचा निर्धार केला आहे. लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पाणपोई चालू करण्यात येत आहेत. आज पुण्यश्­लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पशुंसाठी पाणपोई चालू करण्यात आली. त्याचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ऍड. आण्णाराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले, माजी उपमहापौर देवीदास काळे आदिंच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी बोलत असताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी शासन स्तरावर देखील पशुंसाठी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्या संदर्भात अनेक प्रयत्न केले जात आहेत. मी माझ्या शासकीय निवासस्थानासमोर पशुंसाठी व व्यक्तींसाठी पाणपोई चालू केली आहे. दिवसभरात चार-चार वेळा ते रांजण भरावे लागतात. पुण्यश्­लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या  राज्यातील पशु व मानवाच्या पिण्याच्या पाण्याची जाणीवपूर्वक सोय केली. अहिल्यादेवी यांनी मातृत्वाच्या दृष्टीकोणातून राज्यकारभार केला आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांची प्रेरणा घेवून अशा पद्धतीने पाणपोई चालू करण्याची गरज आहे. आज लातूर येथे ही पाणपोई चालू करण्यात आली. जिल्हाभरातील नागरिकांनी असा उपक्रम कृतीत आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
पांडुरंग शेळके यांच्या स्मरणार्थ विश्­वनाथ पांडुरंग शेळके यांनी लातूर येथील पाणपोईचे सौजन्य स्वीकारले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले, माजी उपमहापौर देवीदास काळे यांनीही काही सुचना केल्या. चंद्रकांत हजारे यांनी प्रास्तावीक केले तर धनराज माने यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांचा धनराज माने व विश्­वनाथ पांडुरंग शेळके यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्यावरील पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर या कार्यक्रमस्थळी येताच पुण्यश्­लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. या कार्यक्रमास शाम भराडीया, विलास देशमुख, ज्योती कापसे, सुभाष लवटे, अनिलकुमार गोयेकर, राजपाल भंडे, डॉ. महादेव बनसोडे, संभाजी सूळ, विशाल देवकते, सुनीता रणदिवे, सुमित्रा चिगुरे, लता घायाळ, माजी नगरसेविका रागिणी यादव, सेवानिवृत्त पोलीस  कर्मचारी शेवाळे, ऍड. अनिरुद्ध येचाळे, ऍड. अजय रेणापूरकर, विशाल देवकते, गणेश शेळके, अभिजीत शेळके, महादेव ढमणे, हरिभाऊ काळे, कैलास होळकर, विजय शेळके, अभिजीत मदने, संतोष मदने, विठ्ठल शेवाळे, अक्षय शेळके आदीसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR