निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील निटूर मंडळ व पानंिचंचोली महसूल मंडळात दि २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस होऊन हजारो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी थोड्याफार पाण्याच्या बळावर शेतक-यांनी रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला अदींची लागवड केली.
मात्र मागच्या चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस कोसळेल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच दि २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यातील पानंिचचोली व निटूर मंडळातील हाडगा, उमरगा (हा), वडगाव, शिवणी कोतल, भोसलेवाडी, वाडीशेडोळ, शेडोळ, तुपडी, पानंिचंचोली, गौर, दगडवाडी, मसलगा, शेंद, ताजपूर, मुगाव, निटूर, ढोबळेवाडी. माचरटवाडी, बसपूर, खडकउमरगा, कलांडी, शिरोळ, वांजरवाडा आदी गावामध्ये वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने मुख्यत: रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले तर काढणीला आलेला ऊस आडवा पडून मोठे नुकसान झाले. थोड्याफार पावसाच्या बळावर शेतक-यांनी कष्टाने पिकवलेली पिके डोळ्यासमोर नष्ट झाल्याने शेतक-यांमध्ये दु:खचे सावट पसरले असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांतून केली जात आहे.