रेणापूर : प्रतिनिधी
महामानव भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झाले. येथून त्यांच्या अस्थी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे दि ४ नोव्हेंबर रोजी रात्री दाखल झाल्या. दुस-या दिवशी सकाळी ८ ते १२ या वेळेत या अस्थीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर चैत्य स्मारकात उत्तरप्रदेश येथील भिख्खू संघ मुख्यमंदीरचे अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे धम्मदीक्षा देणारे भदंत चंद्रमणी यांचे शिष्य असलेले पुज्य भंते अग्गममहापंडीत ज्ञानेश्वर महास्थवीर यांच्या हस्ते पानगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकात भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
उत्तरप्रदेश मधील कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांच्या या पवित्र भूमीत भगवान बुद्धांचे स्तूप उभारण्यात आले. चक्रवर्ती सम्राट अशोकाने भारतात ८४ हजार स्तुपांची निर्मिती केली. हजारो स्तुपांच्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थींचे विभाजन करून लहान-मोठे स्तूप बांधण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पानगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही.के.आचार्य यांच्या परिश्रमातून,तथागतांच्या अस्थी पानगाव येथे आणण्यात आल्या आहेत. पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी सन १९५६ पासून ते आज तागायत पानगाव येथे जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर पानगाव येथे चैत्य स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. यानंतर तथागत बुद्ध यांच्या अस्थीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर प्रदेश कुशीनगर येथून आलेले पुज्यभंते सागरा महाथेरो, पुज्य भिक्खूनी धम्मनयना, आदीसह पुज्य भंत्ते पय्यातिस सिरसाळा, पुज्यभंत्ते धम्मबोधी, चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. के. आचार्य, उपसरपंच शिवाजी आचार्य, वैभव आचार्य आदींची उपस्थिती होती. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तहसिलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, मंडळ अधिकारी कमलाकर तिडके आदींनी भेट देऊन अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गायकवाड, महादू आचार्य, आर. के. आचार्य, राहुल कासारे, आनंद आचार्य, ऋषिकेश आचार्य, सचिन कांबळे, भैया आचार्य, किर्तीकुमार गायकवाड, बी. एस. आचार्य, एम. बी. कांबळे, आदीसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.