21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रपालकमंत्री पदावरून धुसफूस

पालकमंत्री पदावरून धुसफूस

जालन्यात सावेंना तर संभाजीनगरमध्ये शिरसाट यांना विरोध!

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, बंगले आणि दालनांचे वाटप नुकतेच पार पडले. यानंतर आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? यावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती.

मात्र पुन्हा अतुल सावे आम्हाला पालकमंत्री नकोत, अशी ठाम भूमिका जालना येथील स्थानिक शिवसेना पदाधिका-यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार, असे छातीठोकपणे सांगणा-या शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना स्थानिक भाजप पदाधिका-यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. एकूणच शिवसेना-भाजप या महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता दिसते आहे.

मार्च २०२५ मध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना पालकमंत्री म्हणून आपलाच माणूस हवा आहे. गेल्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या संदिपान भुमरे आणि त्यांच्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावर भाजपने दावा केला आहे.

अतुल सावे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे ओबीसी विभागासह दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण तयारी झालेली असतानाही युतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेले पालकमंत्री पद भाजपच्या अतुल सावेंना दिले जाईल, अशी अपेक्षा होती.

मात्र शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आणि अगदी महिनाभरासाठी अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करण्यात आले. त्याचवेळी भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतुल सावे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली होती. परंतु यावरून महायुतीमध्ये वाद नको, असे म्हणत फडणवीस यांनी तेव्हा भाजपच्या पदाधिका-यांना सबुरीचा सल्ला दिला होता.

मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १३२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा आता ‘सबुरी’वर भरोसा राहिलेला नाही असे दिसते. एकंदरीत भाजपच्या पालकमंत्री पदावरील दाव्याने पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे आहेत. आगामी महापालिका आणि त्यानंतर होणा-या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता भाजपचाच पालकमंत्री असावा, असा ठराव भाजपाच्या स्थानिक पदाधिका-यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने त्याग केला, शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. तेव्हाही जिल्ह्यात शिवसेनेचे दोन मंत्री होते, पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच होते.

आता मात्र पालकमंत्री पद अतुल सावे यांना मिळावे, भाजपने किती सहन करायचे? अशी कडक भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. दुसरीकडे संजय शिरसाट हे मात्र माध्यमांसमोर ‘मीच पालकमंत्री होणार’, असे सांगत आहेत. भाजपने त्यांच्या नावाला विरोध केल्यानंतर मात्र त्यांची भाषा आता काहीशी बदलली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका आता संजय शिरसाट घेताना दिसत आहेत. एकूणच संजय शिरसाट यांना भाजप सहजासहजी पालकमंत्री होऊ देणार नाही, असे दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR