पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्यांचे प्रस्थान झालेले असून, पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. पालखी मार्गावरील शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी येथील पालखीतळावर पंढरपूर नगरपालिका, वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने तयारी सुरू करण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्याचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे; तर संत तुकाराम महाराज मेघडंबरीचे रंगकाम करण्यात येत आहे.
वाखरी येथील पालखीतळावर ४ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तिनाथ यांच्यासह मानाच्या सर्व १० पालख्या आणि इतर असंख्य पालखी
सोहळे मुक्कामी असणार आहेत. पालखीतळावरील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी चौथऱ्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे.
२००४ बांधण्यात आलेल्या चौथऱ्यासह संत तुकाराम महाराज मेघडंबरीचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. माउलींच्या पालखीच्या चौथऱ्याच्या सर्व ग्रॅनाईट फरशा नव्याने बसवण्यात येत आहेत. तळावर संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी नव्याने चौथरा बांधण्यात आलेला असून इतर संतांच्या पालख्यांच्या कट्ट्याची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे.
पालखीतळावर चार हायमास्ट दिवे आहेत, तसेच अंतर्गत वीजपुरवठा, पथदिवे यांची व्यवस्था करण्यात अली आहे. यासह तळावर कायमस्वरूपीची ८०८ आणि हंगामी सुमारे ७०० अशा १५०० शौचालयांचे नियोजन आहे.वाखरी ग्रामपंचायतीने गावातील संपूर्ण स्वच्छता पूर्ण केली आहे. तसेच पालखी तळाच्या बाजूचा परिसर ट्रॅक्टरच्या मदतीने स्वच्छ करण्यात आलेला आहे.
पालखीमार्गावर पाणी साठणार नाही, चिखल होणार नाही, यासाठी आवश्यक मुरुमीकरण करण्यात येत आहे. बाजीराव विहीर येथील रिंगणतळावर गवत वाढले होते, ते गवत ग्रामपंचायतीच्या वतीने काढून टाकण्यात आले आहे. पंढरपूर-सातारा रोडवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापून वाहतुकीस येणारा अडथळा दूर केला आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.