22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरपीओपी, रंगांचे भाव वाढल्याने मूर्तिकार अडचणीत 

पीओपी, रंगांचे भाव वाढल्याने मूर्तिकार अडचणीत 

लातूर : प्रतिनिधी
गणेश उत्सव तोंडावर आला आहे. सगळीकडे भक्त्तीमय वातावरण असेल. गणेश बाप्पाची मूर्ती तयार करण्याचे काम सध्या मूर्तीकार कारागिराच्या सहकार्याने करत आहेत. त्यासाठी लातूर शहरात मूर्तिकारांची  लगबग सुरु झाली आहे. काहीजण तर विविध शहरातून गणेश मूर्ती आणतात. काही जण पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती तयार करतात. काही जण मातीची मूर्ती घरीच तयार करतात. पण प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती झटपट तयार होतात आणि सुंदरही दिसतात. परंतू, यंदा पीओपीसह रंगांच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत.
लातूर शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी विविध नामवंत गणेश मंडळांच्या वतीने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा केला जातो. खरे तर गणेशोत्सवात सामाजिक जागरण केले जाते. लातूरसारख्या व्यापारी व शैक्षणिक क्षेत्रात सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सवात भाग घेतात. पारंपारी पद्धतीने कायदा व सुव्यवस्था कायम राखत, शांततेच्या मंगलमय वातावरणात लातूरकर गणेशोत्सव साजरा करतात. गणेशात्सव काही दिवसांवर आला असल्याने विविध गणेश मंडळे तयारीला लागले आहेत. ढोल पथकांचा रात्री उशिरापर्यंत सराव सूरु आहे. मंडप उभारणे, विद्युत रोषणाई करणे यासह गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक कामे केली जात आहेत.
लातूर जिल्ह्यात ३०० च्या जवळपास मूर्तिकार आहेत त्यातील लातूर १०० मूर्तिकार हे लातूर शहरात आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वच मूर्तिशाळांमधील जागरण आता वाढले आहे. मूर्तिकार उमेश सोनवळकर यांनी माहिती देताना सांगीतले, यंदा पीओपी, फ्लोरोसंट पाऊडर, गोल्डन कलर, ऑईल बॉन्ड या कच्च्या मालाच्या किंमतीत २० टक्के वाढ झाल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. त्यातच मूर्तिकाम हे कष्टाचे काम असल्यामुळे या क्षेत्रात कारागिर मिळणे आता अवघड झाले आहे. एकट्या मूर्तिकाराने किती मूर्त्या बनवाव्यात त्यालाही मर्यादा आहेत. तरीही विविध मंडळ्यांनी मूर्तिची मागणी नोंदवली. त्यामुळे ६ ते ८ फुटाच्या ३० ते ४० गणेश मूर्त्या बनवल्या आहेत. येत्या काळात मूर्तिकामाला कारागिर नाही मिळाल्यास मूर्तिशाळाच बंद पडतील, असे सोनवळकर म्हणाले.  दरम्यान लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील राजस्थान विद्यालयाच्या जवळ विलासराव देशमुख मार्गावर शहरातील मूर्तिकारांना मूर्ती विकण्यासाठी स्टॉल लावण्यास जागा उपलब्ध करुन दिली असून ६० ते ७० स्टॉल उभारण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR