पिंपरी : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की विझवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल विभागाची सर्व १५ अग्निशमन वाहने, याशिवाय, पुणे महापालिकेची पीएमआरडीएची आणि टाटा मोटर्ससारख्या अनेक खाजगी कंपन्यांची अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी साडे दहा वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळाली की , कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना आग लागली. या आगीत १०० हून अधिक दुकाने आणि भंगार गोदामे जळून खाक झाली. या घटनेने शहरभर धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत भूतकाळात या ठिकाणाहून लहान-मोठ्या औद्योगिक युनिट्स आणि भंगार गोदामांना आग लागण्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये देखील या परिसरात भीषण आग लागली होती.