अहिल्यानगर : प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट करण्यात आले होते. यामुळे मुलांना शाळेत जाताना केवळ एक पुस्तक न्यावे लागत होते. मात्र जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बालभारतीकडून नव्याने पुस्तके मिळणार आहेत. आता पूर्वीप्रमाणे प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक दिले जाणार आहे. अर्थात दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार आहे.
राज्य सरकारकडून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पूर्वीप्रमाणे मिळणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हलके मोजक्याच पुस्तकांत सर्व विषय समाविष्ट करण्यात आले होते. पण यंदा हा नवा प्रयोग बंद होणार आहे. त्यामुळे पुस्तकांचे वजन पुन्हा वाढणार आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा परिषदेने स्वतंत्र पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच बालभारतीकडे प्लॅटफॉर्मवर मागणी नोंदवावी लागते. त्यानुसार ही नोंद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
११ लाख २८ हजार पुस्तकांची मागणी
यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते आठवीसाठी १ लाख ८० हजार ४७४ विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यांच्यासाठी ११ लाख २८ हजार १६९ पुस्तके मागविली आहेत. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत १ लाख ५५ हजार १३१ पुस्तकांनी अधिक आहे. एकूण ई-बालभारतीकडे चार लाख सहा हजार ३०० विद्यार्थ्यांसाठी २३ लाख ५८ हजार १३९ पुस्तकांची मागणी आहे. अनुमानित दराने या पुस्तकांसाठी ४ कोटी १५ लाख रुपये खर्च येईल, तर सहावी ते आठवीसाठी १ कोटी २२ लाख ५० हजार रुपये खर्च येईल. ही पुस्तके शाळांनीच खरेदी करायची आहेत.
गणवेश शाळांकडूनच खरेदी
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिले जात असतात. या गणवेश देण्याबाबत दरवर्षी नियम बदलत असतात. कधी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकून गणवेश खरेदी तर कधी शाळेकडून कापड खरेदी करून गणवेश शिवून दिला जात असतो. त्यानुसार यंदा देखील यात बदल झाला असून आता विद्यार्थ्यांचा गणवेश शाळांनीच खरेदी करावा लागणार आहे.