पुरी : वृत्तसंस्था
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा भाऊ स्रेहाशीष गांगुली आणि वहिनी अर्पिता गांगुली ओडिशातील पुरी येथे सुट्टीसाठी गेले होते. रविवारी ते समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी दरम्यान स्पीडबोटमध्ये होते, पण समुद्राच्या उग्र लाटांमुळे बोट उलटली आणि ते पाण्यात फेकले गेले.
पण, बचावपथकाने घाईने धाव घेत दोघांनाही वाचवले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये स्पीडबोट उलटलेली दिसते आणि बचावपथक प्रयत्न करताना दिसते.
दरम्यान, सौरवच्या वहिनी अर्पिता गांगुली यांनी अपघातानंतर गंभीर आरोप केले आहेत. बोटीवर प्रवाशांची संख्या खूपच कमी ठेवण्यात आली होती, ज्यामुळे ती असंतुलित होऊन उलटली, असे त्यांनी म्हटले आहे. समुद्र आधीपासूनच खूपच खवळलेला होता. बोटीची क्षमता १० प्रवाशांची होती, पण केवळ ३-४ प्रवाशांना घेऊन बोट समुद्रात गेली. आम्ही सुरुवातीला समुद्रात जाण्याबाबत शंका व्यक्त केली होती, पण बोट चालवणा-यांनी आम्हाला खात्री दिली की काही धोका नाही, असे अर्पिता गांगुली यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, समुद्रात गेल्यावर काही क्षणांतच एक मोठी लाट आल्याने बोट उलटली. लाईफगार्ड्स वेळेवर आले नसते, तर आम्ही वाचलो नसतो. आम्ही अजूनही धक्क्यात आहोत. अशा गोष्टीचा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता. बोटीत जास्त लोक असते, तर कदाचित ती उलटली नसती असंही त्यांनी नमूद केले.
कारवाईची मागणी
अर्पिता गांगुली यांनी संबंधित बोट ऑपरेटरांवर कारवाईची मागणी केली असून, अशा वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. पुरी समुद्रकिना-यावर समुद्र अतिशय खवळलेला असतो. मी कोलकात्याला परत गेल्यावर पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून येथे वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.