पूर्णा : भारतीय जनता पक्षाने पूर्णा तालुक्यात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. दि.२ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर), माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक क्षण राहिला. शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज नेते बालाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली कृउबा समितीचे सभापती, संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत ठाकरे गटाला जबर धक्का दिल्याचे मानले जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, उपसभापती नारायण पिसाळ, माजी पंचायत समिती सभापती व्यंकटराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सोळंके, मनोज सोळंके, जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, अरुण कोल्हे, माणिक भुमरे, प्रभाकर दादा वाघीकर, बाजार समितीचे संचालक दीपक बोबडे, डॉ. जयप्रकाश मोदानी, नामदेव ठाकूर, संतराम ढोणे, छबू लोखंडे, माधव नादरे, सुरज पारवे या प्रमुख नेत्यांसह एकूण नऊ संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय, बाजार समितीचे माजी संचालक उत्तमराव नादरे, अशोक खैरे, बालाजी डाखोरे, आनंद सोनटक्के, सरपंच कैलास वाघ, राजू कुर्रे, माणिक बोकारे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
हा प्रवेश केवळ पक्षबदल नसून, भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी मोठी चिन्हे ठरू शकतात.
या अभूतपूर्व पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूर्णा तालुक्यातील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रवेशाचा भाजपसाठी मोठा विजय असल्याचे सांगितले. पूर्णा तालुक्यात भाजपची ताकद वाढत असून आगामी निवडणुकीत पक्ष मोठ्या प्रमाणावर विजय मिळवेल, असे ते म्हणाले.
या पक्ष प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. भाजपने आपल्या संघटनात्मक ताकदीचा उपयोग करून विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का भविष्यात भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.