अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचा टँकरला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये टँकरचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात झाल्यानंतर गावागावांमध्ये वा-यासारखी बातमी पसरली. मग काय पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी अपघातग्रस्त टँकरच्या बाजूने घोळका केला. मिळेल त्या भांड्यामध्ये पेट्रोल भरून गावकरी पसार झाले. याचा व्हीडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या करंजी घाटात २० हजार लिटर क्षमतेच्या पेट्रोलचा टँकर उलटून अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईवरून परभणीच्या दिशेने हा टँकर निघाला होता. पण घाटामध्ये हा टँकर उलटला. टँकरचे ब्रेक फेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ टँकरला अपघात झाला. या अपघातामध्ये टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे.
पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्याचे कळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ज्याला जे शक्य होईल ते भांडे घेऊन पेट्रोल भरण्यासाठी घेऊन आले. कुणी पाण्याच्या बाटल्या, कुणी पाण्याचे कॅन तर कुणी दुधाच्या किटल्या घेऊन आले आणि त्यामध्ये पेट्रोल भरून ते पसार देखील झाले. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती त्यामुळे माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरले होते.