लातूर : एजाज शेख
अविनाश हे एक विचित्र पात्र. तो मनात येईल ते लिहीत असतो. ही त्यांची घाणेरडी सवय. त्याच्या या सवईमुळे घडणा-या घटना, हलक्या, फुलेक्या विनोदाने एकांकिका पुढे सरकत जाते. परंतू, सुमार सादरीकणामुळे पेन सही सलामत राहिला, सादरीकरणाचे काय झाले?, असा प्रश्न नाट्यरसिकांना पडला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जिल्हा शाखा लातूर व दयानंद कला महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग लातूरद्वारा आयोजित नटवर्य श्रीराम गोजमगुंडे स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पहिल्याच दिवशी म्हणजेच स्पर्धेच्या उद्घाटनानंतर कथाकार नाट्यमंडळी पुणे या संस्थेच्या वतीने व. पु. काळे यांच्या कथेवर आधारीत अमय वडगावकर, सुरज रानडे लिखीत आणि शार्दुल राजापूरे, संदेश कांबळे दिग्दर्शित ‘पेन सलामत तो’ ही एकांकिका सादर करण्यात आली.
या एकांकितेतील अविनाश ही मध्यवर्ती भुमिका पवन साणडे याने साकारली. या पात्राने संपुर्ण एकांकिका अक्षरश: ओढत नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला मधुमती मिरासदार(ऋता मोडक), सासरा(अमेय वडगावकर) या पात्रांची थोडीशी साथ मिळाली. वसंत काळे (सौरभ नवरे), अनुराधा टिपणीस(दिव्या शिंदे), अनुराधा काळे (बिन्वा मुळे), बांदीवडेकर(पियुष चांगण), मोहिते(गौरव काळे), चपराशी (अद्वैत अय्यर), पेनवाला (भार्गव शहाणे), साहेब (संदेश कांबळे), सहकर्मचारी (अमित तिखाडे), सहकर्मचारी (शार्दुल राजापूरे) यांनी भुमिका साकारल्या. प्र्रमुख पात्रांच्या भुमिका वगळता इतर पात्रांनी निराशा केली. चपराशी, पेनवाला आणि सहकर्मचा-यांच्या हलचाली अनावश्यक होत्या. संगीत ब-यापैकी होते. नैपथ्य, वेशभूषा, रंगभुषा आणि प्रकाश योजना एकांकिकेला अनुरुप होती.