नवीन पिढीबद्दल बहुतांश लोकांची एक प्रमुख तक्रार असते आणि ती म्हणजे ते एकाच ठिकाणी फार काळ टिकून राहत नाहीत. आपण कितीही चांगला व्हीडीओ तयार करा आणि तो किमान अर्धा तास जरी एकाच ठिकाणी बसून पाहिला तर नशीब. या मागचे कारण म्हणजे त्यांचे पॉपकॉर्न ब्रेन. होय आजकाल ही संकल्पना खूप प्रचलित झाली आहे. यात ही पिढी सतत एकानंतर दुसरा, दुस-यानंतर तिस-या विचारांच्या मागे धावत असतात. या पिढीचा मेंदू खरोखरच उतावीळ असतो आणि त्याला सारखे नवनवीन विचार सुचत असतात. दुर्दैवाने त्यांचे कोणतेच विचार फार काळ टिकत नाहीत म्हणून मानसोपचार तज्ज्ञांनी या स्थितीला पॉपकॉर्न ब्रेन ही संज्ञा वापरली. या शब्दाचा पहिला वापर २०११ मध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे एक संशोधक डेव्हिड लेव्ही यांनी केला.
पॉपकॉर्न ब्रेनची कारणे
आता प्रश्न उपस्थित राहतो की, नव्या जनरेशनला पॉपकॉर्न ब्रेन म्हणण्याचे कारण काय? यासाठी कोण जबाबदार? अर्थात ब-याच अंशी पालकदेखील तितकेच जबाबदार आहेत. याचे कारण जाणून घेण्यासाठी इतिहास पहावा लागेल. दुस-या युद्धानंतर युरोप आणि अमेरिकेत जेव्हा स्थैर्य वाढले आणि विकासाचा वेग वाढला, सर्वत्र सुबत्ता दिसू लागली तेव्हा अचानक पालकांना आपण सोसलेले कष्ट मुलांना पडू नयेत, याचा विचार येऊ लागला. पाल्यांना सर्व सुखसोयी आणि सुविधा देण्याचा विचार पालकमंडळी करू लागली. या कारणांमुळेच गेल्या पाच-सहा दशकांत अमेरिका आणि युरोपीय देशांतील पालकांनी आपल्या मुलांना सर्वस्व देण्यासाठी आणि आर्थिक अडचणींमुळे स्वत: जे होऊ शकले नाहीत ते स्वप्न साकारण्यासाठी पाल्यांना हाताशी धरले. तत्कालिन काळात पालकांनी आपल्या मुलांना संगणक शिकवले, आरोग्याबाबत सजग केले, किमान एक किंवा दोन म्युझिकल इन्स्टिमेंटस शिकवले, फाइन आर्ट, डान्स, स्पोर्ट्सही शिकवले, नाट्य चळवळीत सक्रिय केले.
भारतातही ट्रेंड
गेल्या शतकात भारतातील मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या मुलांसाठी एवढा खर्च आणि सुख सुविधा देण्यास सक्षम नव्हता. याचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित स्रोत आणि ध्येयदेखील नव्हते. त्याच बरोबर व्यावहारिक पातळीवर त्यांना कोणी स्पर्धकही नव्हता; परंतु मागच्या शतकाच्या अखेरीस भारतातही पालकांची नवी पिढी विकसित होऊ लागली. खासगी आणि सरकारी क्षेत्रात कर्मचा-यांच्या वेतनात बूम आले आणि पाल्य हेच सर्वकाही असे मानणारी पश्चिमी विचारसरणी भारतातही बळावली. भारताचे पालकही आपल्या पाल्यांत ‘डिझायनर बेबी’ म्हणून पाहू लागले. अमेरिका आणि युरोपमध्ये गेल्या शतकात म्हणजे ५० ते ६० च्या दशकांत पहावयास मिळालेली जीवघेणी स्पर्धा ही मागच्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात शिरली. महानगरातील पालक हे आपल्या मुलांत एवढे कौशल्य ठासून भरण्यासाठी आतूर झाले. वयाने खूपच लहान असलेल्या पाल्यांकडे क्रीडा, अभिनय, संगीत, चित्रकला किंवा अन्य क्षेत्रांतील एखाद्या स्टारप्रमाणे पाहू लागले.
या ओढाताणीतून कॉन्व्हेंट शाळेत अभ्यास करणारी मुले ही रात्री १० वाजेपर्यंत बिझी राहू लागली. या वेळी पालकांनी त्यांना पौष्टिक आहार दिला खरा; परंतु थोडा आराम केल्यानंतर गणित, विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच पोहणे, क्रिकेट, गिटार, पेटिंग आणि डान्स शिकण्यासाठी अनेक वर्गात पाठवू लागले. परिणामी ते ना ख-या अर्थाने चांगले खेळाडू होऊ शकले ना गुणवान विद्यार्थी. एकाच वेळी सर्व गुणसंपन्न करण्याच्या नादात एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली. स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी या काळात वाढलेली मुलं ही पॉपकॉर्न ब्रेनचे तरुण म्हणून बाहेर येऊ लागले. नेहमीच एखादी स्पर्धा अर्धवट स्थितीत सोडणा-या या पिढीचे कशातच लक्ष लागत नाही. ते एकाग्र राहू शकत नाहीत आणि एखादा टाइमटेबल व्यवस्थितही फॉलो करू शकत नाहीत. ते कोणत्याही एखाद्या कामाला प्राधान्य देऊ शकत नाहीत. या मागचे कारण म्हणजे ही पिढी प्रत्येक क्षेत्रात काम करू इच्छिते आणि कोणतेच काम सोडू इच्छित नाहीत तसेच त्यांना नियमित ब्रेकदेखील नको असतो. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीदेखील सांगता येत नाहीत आणि ते छंद कशामुळे आहेत, हेदेखील धड सांगू शकत नाहीत? प्रत्यक्षात ते ‘माइंडलेस स्क्रॉलिंग’ला बळी पडले आहेत. त्यांना प्रत्येक वस्तू हवी असते.
एखाद्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत न करता वावरणा-या या पिढीला दर दोन वर्षाला नवीन मोबाईल हवा असतो. ते ‘यूज अँड थ्रो’वर विश्वास ठेवत असतात. डिझायनर ड्रेसेसची गेल्या दोन दशकांत अनेक हजार पटींनी मागणी वाढली आहे. ही चंचल पॉर्पकॉन ब्रेनची पिढी वाढली नसती तर डिझायनर ड्रेसेसला मागणी आली नसती. आज मध्यमवर्गीयांतदेखील लाखो यंगस्टर्स असे आहेत की ते कपडे गरजेसाठी किंवा आवडीनुसार नाही तर ते स्वत:ला सतत अप टू डेट ठेऊ इच्छित असतात. हाच ट्रेंड त्यांना मोटारसायकल, मोबाईल फोन, लॅपटॉप, संगीत साहित्य यासारख्या गोष्टीत पहावयास मिळत आहे. मूठभर ग्राहक असूनही मागणी वाढल्याने ती उपलब्धतेच्या तुलनेत ५ ते १० टक्के अधिकच आहे. हा अनुभव येण्यामागचे कारण म्हणजे नवीन पिढील चंचल आहे. आपल्याला काय पाहिजे, काय नको, हे याच पिढीला ठाऊक नाही फक्त त्यांना हवे असते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, पॉपकॉर्न ब्रेन असलेल्या पिढीच्या स्वभावाला ते स्वत:च जबाबदार नाहीत; परंतु त्याचे परिणाम त्यांनाच सहन करावे लागत आहेत.
– प्रा. विजया पंडित