मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हल्लेखोराने मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे ३५ पथकं नेमून सुद्धा तो मुंबईबाहेर पळण्यात यशस्वी ठरल्याचे समोर येत आहे. विरोधक या प्रकरणात धार्मिक अँगल असल्याचा दावा करत आहेत. यामुळे आता याप्रकरणाला गंभीर वळण मिळाल्याचे दिसून येत आहे.
सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचे दिसून आले आहे. त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने या दुकानातून ५० रुपयांचा हेडफोन खरेदी केला. तो या दुकानात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमे-यात कैद झाला. सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आला. तरीही दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याने तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सैफ अली खान याच्या वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीतील १२ व्या मजल्यातील सदनिकेत हा हल्लेखोर लपला होता. रात्री दोन ते अडीच दरम्यान तो त्याच्या मुलाच्या बेडरूममधून बाहेर आला. त्याने पैशांची मागणी करत वाद घातला. त्यानंतर सैफ अलीवर ६ वार केले. त्यातील दोन वार घातक ठरले. सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचे समोर येत आहे.
आरोपी पळाला गुजरातकडे
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने वांद्रे ते विरारपर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. आरोपी गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक आता महाराष्ट्राबाहेर आरोपींचा शोध घेत असून, पोलिसांचे एक पथक गुजरातलाही गेले आहे.