संभाजीनगर : शालेय पोषण आहाराच्या काळाबाजार प्रकरणात अखेर तिस-या दिवशी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गजानन अॅग्रो सेल्स कॉर्पाेरेशनचा मालक संजय भगीरथमल, व्यवस्थापक मतिनोद्दीन गझनफरोद्दीन काझी, बलवंतसिंग चौहान व रोहित सिंग यांना आरोपी करण्यात आले.
पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी करोडी शिवारातील भगीरथमलच्या कंपनीवर कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पाच्या आहारातील धान्यासह पंजाब शासनाचे हजारो पोते धान्याचे रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंगमध्ये बाहेरील राज्यात विक्री होत होती. या धान्याच्या लिलावास मनाई असताना शासनाच्या एका पोत्यातून २० ते २५ खासगी नावाने पाकिटे तयार केली जात होती.
धान्याच्या काळाबाजार प्रकरणात तक्रार देण्याबाबत शासनाच्या विविध विभागांची टोलवाटोलवी सुरू होती. अखेर, कन्नडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर निरीक्षक रेखा लोंढे यांनी गुन्हा दाखल केला.
प्राथमिक माहितीनुसार, पोषण आहाराचा ऐवज अंगणवाडीपर्यंत पोहोचला की नाही, बाजारात फेरविक्री झाली का, यासाठी त्यांचे डिस्पॅच क्रमांक मागवले आहेत. यात कोणत्या अंगणवाडीकडून माल गेला हे निष्पन्न होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.