28.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपोषण आहारात सापडला मृत उंदीर

पोषण आहारात सापडला मृत उंदीर

रायगडमध्ये स्वतंत्र समितीमार्फत चौकशी

मुंबई : जागतिक महिला दिनी नवी मुंबईच्या ऐरोलीमधील एका हॉटेलमध्ये महिलांच्या डिशमध्ये उंदीर सापडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच रायगड जिल्ह्याच्या वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणा-या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याचे समोर आले आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले.

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करताना, याप्रकरणी पुरवठादारावर कारवाई करणार का? असा प्रश्न महायुती सरकारला विचारला. त्यावर या सर्व प्रकाराची एका समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बुधवारी बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यात रायगडच्या वडखळ येथील पोषण आहाराचाही मुद्दा होता. वडखळ येथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळांमध्ये देऊनही तपासणी करण्यात आली नाही, हे गंभीर आहे.

या प्रयोगशाळा सरकारच्या असून तेही असे नमुने तपासात नसतील तर, काय कारवाई करणार? अशी पाकिटे जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात असे अन्न असेल तर ते बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार? असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

याप्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली असल्याचे सांगत, महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी, याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनीही नमुने तपासले नाहीत, याचीदेखील या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच, चौकशीअंती या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार याला जबाबदार असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी दिले.

नवी मुंबईच्या ऐरोली येथील पर्पल बटरफ्लाय या हॉटेलमध्ये काही महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त जेवणाचा बेत केला होता. मात्र, त्यांच्या डिशमध्ये उंदीर आढळल्याने खळबळ उडाली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने असे काही झालेच नाही, असा आव आणला. मात्र महिलांनी अगोदरच त्याचे व्हीडीओ, फोटो काढल्याने हॉटेल मालकाची बोलती बंद झाली. मात्र, याबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलांना रात्री दीडपर्यंत रबाळे पोलिसांनी ताटकळत ठेवले. त्यामुळे त्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पाठोपाठ वडखळ येथील हा प्रकार समोर आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR