निलंगा : प्रतिनिधी
संशोधन हा शिक्षणाचा एक भाग आहे. दुस-यात योग्यता निर्माण करणे म्हणजे शिक्षण. अशा प्रकारचे संशोधन होताना परंपरा, प्रतिमा यातील विज्ञान समजून घेतले तरच मूर्तीचा अभ्यास करता येईल, असे मत भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले .
महाराष्ट्र महाविद्यालय, इतिहास विभाग व भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर हे उपस्थित होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर, मूर्ती कलेचे अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के, प्राचार्य डॉ. इमाधव कोलपुके, प्राचार्य डॉ. भागवत पौळ, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, सचिव डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. सोमेश श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
नाणे ही प्रतिमा वा मुद्रा आहे, पण ते ज्याच्या हातात पडेल तो त्याचा वेगवेगळा अर्थ लावून वापर करतो. त्याने लावलेला हा वेगवेगळा अर्थ समजून घेऊनच संशोधन केले पाहिजे, असे सांगून डॉ. जामखेडकर म्हणाले की, उत्तर भारताच्या संदर्भात मूर्ती, शिल्प, लेणी, स्तूप, चैत्यगृह याबाबतीत भरपूर ऐतिहासिक मांडणी झालेली आहे. दक्षिण भारताच्या बाबतीत अशी मांडणी झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दक्षिण भागाचेही फार मोठे योगदान आहे ते संशोधकांनी शोधावे, असे ते म्हणाले.
प्रोफेसर ई.शिवनागिरेड्डी म्हणाले की, दक्षिण भारतीय कला आणि प्रतिमा शास्त्रातील शैलचित्र, लेणी, स्तूप, चैत्यगृह, मंदिरे आणि मूर्तीशिल्प हे फार वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम देशातील तरुण संशोधक पिढीचे आहे. आपल्या बीज भाषणातून त्यांनी दक्षिण भारतातील सर्व ऐतिहासिक कला शिल्पांचा इतिहास संबोधित केला. वेगवेगळ्या कालखंडात नवीन शिल्प कसे निर्माण झालेत याबद्दल तेलंगाना, कर्नाटक, आंध्राप्रदेश आणि तामिळनाडू या भागातील शिल्प निर्मितीच्या संदर्भात ऐतिहासिक माहिती त्यांनी नोंदविली. यावेळी डॉ. राहुल वरवंटीकर, डॉ. अरविंद सोनटक्के यांची समायोजित भाषणे झालीत.
अध्यक्षीय समारोपात निलंगेकर म्हणाले की, भारतीय मूर्ती व शिल्पकला संशोधन परिषदेशी झालेल्या सामंजस्य करारामधून होत असलेल्या या चर्चासत्राच्या निमित्ताने प्राध्यापक संशोधक व विद्यार्थ्यांसाठी नव्या संशोधनाच्या दिशा खुल्या होतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. तर आभार डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले.