24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरप्रत्येक गावात क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे

प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे

लातूर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचा दर्जा उंचावयाचा असल्यास भारतातील प्रत्येक खेड्यात जाणीवपूर्वक क्रीडा संस्कृती रुजवण्याची नितांत आवश््यकता असल्याचे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सभागृहात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, क्रीडा विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीक रोमन आणि फ्रीस्टाइल आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर शिक्षण संस्थेचे सहसचिव सुनीलजी मिटकरी, विद्यापीठ निवड समितीचे प्रा. मधुकर क्षिरसागर, पंच समितीचे प्रमुख डॉ. विठ्ठल डुमनार, प्रा. टी. एस. केंद्रे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुरुवातीला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, शिक्षण संस्था, राजकारणी आणि समाज दुरिणांची प्रभावी भूमिका तसेच प्रसारमाध्यमांच्या योगदानातून देशाच्या कानाकोप-यात क्रीडांगणे भरली पाहिजेत. भारतीय परंपरेत खेळाला सर्वाधिक महत्त्व आहे. आपण पूर्वजांची परंपरा विसरत चाललो आहोत.

चित्तशुद्धी आणि देहशुद्धीकरिता विविध खेळ प्रकार महत्त्वाचे आहेत. रामायण आणि महाभारत यातही कुस्ती या क्रीडा प्रकाराचे दाखले आपणास मिळतात. लातूर ही शिक्षणाची पंढरी मानले जाते. पण अलीकडच्या काळात कुस्तीतही लातूरने नवा पॅटर्न तयार केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना संधी देणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि वारंवार त्यांचा सराव घेणे या गोष्टी केल्यास नक्कीच भविष्य उज्वल असेल असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे सहसचिव सुनीलजी मिटकरी म्हणाले की, कुस्ती या खेळाला आपण सर्वांच्या सहकार्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सर्व कुस्तीगिरांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले पाहिजे. कुस्ती हा खेळ बुद्धिचातुर्य आणि शरीर सशक्तिकरण आणि युक्तीचा प्रभावी खेळ असल्याचेही सांगून लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली येथून आलेल्या सर्व कुस्तीपटूंना प्रशिक्षक, पंच, आणि कोच यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, कोणत्याही क्रीडा प्रकारात राजकारण न आणता खेळाडूंना सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. ओस पडत जाणारी मैदानी पुन्हा नव्याने संजीवनी देऊन सेवा सुविधा पुरवून शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास खेळाला चांगले दिवस येतील असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार डॉ. टी घनशाम यांनी मानले या स्पर्धेला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील ७० पेक्षा अधिक मल्ल उपस्थित होते. ग्रीक रोमन आणि फ्रीस्टाइल या दोन प्रकारातील मल्लांची झुंज पाहण्यास मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR