लंडन : वृत्तसंस्था
किंग्ज कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत मानवी दात वाढविण्यात यश आले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेत दात वाढविण्यासाठी वापरल्या जाणा-या पद्धतीनुसार, ते मानवी तोंडात देखील वाढवता येतात. जर असे झाले तर दंतचिकित्सा क्षेत्रातील हे एक मोठे संशोधन असेल. त्यामुळे आता दात तुटले तरी लोकांना फिलिंग्ज किंवा इम्प्लांटऐवजी नैसर्गिक दात मिळू शकतील.
एका अहवालानुसार, मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत दात तयार करण्यात आले होते. ते जबड्यावर सहजपणे लावता येतील. कोणत्याही दोषाच्या बाबतीत ते ख-या दाताप्रमाणे दुरुस्त करता येतील. शास्त्रज्ञांची टीम आता दोन पद्धतींवर प्रयोग करत आहे. पहिली पद्धत म्हणजे प्रयोगशाळेत पूर्ण दात वाढवणे आणि तो जबड्यात
रोपण करणे.
दुस-या पद्धतीत, दाताच्या सुरुवातीच्या पेशी जबड्यात बसवल्या जातील. तिथे दात स्वत:हून विकसित होईल. दुधाचे दात पडल्यानंतर बालपणात नवीन दात येतात तसे ते हळूहळू वाढतील.
जर दात तुटला तर त्याच्या जागी नवीन दात येऊ शकेल यासाठी शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. या प्रक्रियेत, दातांच्या लहान सुरुवातीच्या पेशी मानवी जबड्यात घातल्या जातील. या पेशी हळूहळू ख-या दातांमध्ये बदलतील, असे शास्त्रज्ञांच्या टीममधील सदस्यांनी सांगितले.
शार्क, मासे आणि हत्ती आयुष्यभर नवीन दात वाढवू शकतात, परंतु मानवांकडे असा पर्याय नाही. लोकांचे दात तुटल्यावर ते फिलिंग्ज व इम्प्लांट करतात. हा तात्पुरता उपाय आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की फिलिंग्ज, इम्प्लांट्स कालांतराने दातांना इजा पोहोचवतात. प्रयोगशाळेत वाढवलेले दात ख-या दातांसारखे असतील. ते देखील अधिक मजबूत असतील. पेशींपासून तयार केलेले, जबड्यात सहजपणे बसवले जातील.