लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाची (स्वायत्त), विद्यार्थिनी प्राची मोरे हिची नवी दिल्ली येथे राजपथावर राष्ट्रपती यांच्यासमोर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनासाठी एनसीसी टीममध्ये निवड झाली आहे. सदर संचलनासाठी पूर्व तयारी शिबीरात ती सहभागी झाली आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयात सेव्हन महाराष्ट्र गर्ल्स बटालियन अंतर्गत गेल्या ५१ वर्षांपासून मुलींचा एनसीसी विभाग कार्यरत आहे. या विभागाद्वारे ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्राच्या वरिष्ठ विंगमधील ५४ कॅडेट्सना दरवर्षी प्रशिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयाने पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्त्ती, नेतृत्व, गुणवत्ता, सांघिक कार्य इत्यादी मूल्ये रुजवण्यासाठी एनसीसी विभाग सुरु केला आहे. प्राची मोरेने प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरासाठी निवड होण्यापूर्वी राहुरी, अहमदनगर आणि पुणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या विविध शिबिरांना हजेरी लावली आहे. प्राची ही लातूर येथील रहिवासी संजीवनी व परमेश्वर मोरे यांची मुलगी आहे.
या यशाबद्दल शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव अॅड. सुनिल सोनवणे, सदस्य प्राचार्य डॉ. आर. एल. कावळे, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सेव्हन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किशोर भागवत, उपप्राचार्य प्रा.सदाशिव शिंदे, पर्यवेक्षक प्रा. सोमदेव शिंदे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. अर्चना टाक, लेफ्टनंट, डॉ. महेश वावरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.