लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज दि. १४ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना असल्यास, त्या १४ ते २१ जुलै या कालावधीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत सादर करता येतील. सर्व संबंधितांनी प्रारूप प्रभाग रचनेचे अवलोकन करून हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.