15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांच्या ‘सागर’वर ‘प्लॅन बी’संदर्भात खलबते

फडणवीसांच्या ‘सागर’वर ‘प्लॅन बी’संदर्भात खलबते

मुंबई : प्रतिनिधी
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून भाजपचे राजकीय खलबतं होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनसेचे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकरही सहभागी झाले आहेत.

राज्यात भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पुढील रणनीती काय असू शकेल, यासंदर्भात सागर बंगल्यावर चर्चा होत असल्याची माहिती आहे. निकालानंतर सर्व आमदारांना एकत्र करण्यासाठी विशेष जबाबदारी काही नेत्यांवर या बैठकीत दिली जाण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांनी देखील यावेळी आपली उपस्थिती दर्शवली.

महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची सध्या सार्वजनिकरित्या कोणतीही बोलणी सुरु नाही. मात्र, शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. अपक्षांशी आणि छोट्या पक्षांशी बोलणी करुन सर्व गणितं जमवायची आहेत. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर महायुती अपक्ष आणि बंडखोरांशी बोलणी सुरु करेल. त्या दृष्टीने सागर बंगल्यावरील आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या बैठकीच्या अनुषंगाने बाळा नांदगावकर यांनी स्वत: भाष्य करत कालिदास कोळंबकर यांच्या मुलाची लग्नपत्रिका देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शिवडीमध्ये भाजपने पाठिंबा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी आज भेट घेतली. राज्यात महायुतीच सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. मात्र हे टायमिंग लक्षात घेता अनेक चर्चा होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR