मुंबई : प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात लाडकी बहीण या योजनेतील चार लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. यानंतर आता फेब्रुवारीमध्ये पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या महिलांचा आकडा एकूण ९ लाख झाला आहे. मार्च महिन्याची १ तारीख उलटूनही फेब्रुवारीचा मिळालेला नाही, तो कधी मिळणार? याकडे बहिणी डोळे लावून बसल्या आहेत. मात्र, आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? कुठल्या दिवशी येणार? याबाबत स्वत: महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत आली. ही योजना महायुतीसाठी ऐतिहासिक आणि गेमचेंजर ठरली आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होत आहे. मार्चची एक तारीख होऊन गेली तरीही फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वित्त विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला ३४९० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता वितरीत करण्यास उशीर होत आहे. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींतून उपस्थित केला जात आहे, असा प्रश्न मंत्री अदिती तटकरेंना विचारला असता, आता फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा करायचा? किती तारखेला जमा होईल? आणि कधीपासून यायला सुरुवात होईल? याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी बोलताना दिली आहे.
नवीन निकषामुळे घट
जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ देण्यात आला होता. यावेळी ५ लाख महिलांना अपात्र ठरवले होते. यानंतर आता अनेक नवीन निकषांमुळे अनेक लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाली आहे. दरम्यान, २ कोटी ३७ लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मिळतील, असे बोलले जात आहे. मात्र, जेव्हा सुरुवातीला सरसकट अर्ज दाखल केले होते, तेव्हा निकष का पाहिले नाहीत?, तेव्हा सर्वांना या योजनेचा लाभ का दिला गेला? असा प्रश्न लाडक्या बहिणींनी उपस्थित केला आहे.