नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला ३ राज्यांत मोठे यश मिळाले असून, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसतानाही पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगडमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून, आता त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यातच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढील पाच वर्षांचा आराखडा मांडून लगेचच फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू करून मार्चमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अनुकूल वातावरणाचा लाभ उठविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये आचारसंहिता लागू करण्याऐवजी फेब्रुवारीतच आचारसंहिता लागू करून मार्च महिन्यात निवडणुका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिले जात होते. या निवडणुकीत भाजप बाजी मारणार की कॉंग्रेस, यावर आगामी निवडणुकीचे गणित ठरणार होते. यामध्ये भाजपला तीन राज्यांत मोठे यश मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच पक्षीय पातळीवर अगोदरपासूनच मतदारसंघनिहाय आढावाही घेतला गेला आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने आखणी केली आहे. त्यामुळे मार्चमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.