27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयबंडोबांमुळे बंडाळी!

बंडोबांमुळे बंडाळी!

बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची शकले उडाली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकूण ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक पक्ष निवडणुकीत उभे असल्यामुळे जितके उमेदवार, तितकीच बंडखोरीही वाढीस लागली आहे. इमानेइतबारे अनेक वर्षे पक्षाची सेवा करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकिट नाकारण्यात आल्याने राज्यातील बहुतेक मतदारसंघांत बंडखोरीचे पेव फुटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत खेचून बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी केला. तरीही महायुती व महाविकास आघाडीचे शंभरहून अधिक दखल घेण्याजोगे बंडखोर रिंगणात उतरले असून बंडाचे झेंडे खाली उतरवण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. युती किंवा आघाडीतून तिकिट मिळत नसल्याने विविध राजकीय पक्षांतील नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यामुळे बंडखोरीचा मोठा फटका सहन करावा लागणार असल्याने त्या ठिकाणची हक्काची सीट धोक्यात आल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून दिवाळीच्या धामधुमीत नेत्यांना बंडखोरांच्या मिनतवा-या करत फिरावे लागणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत हजार, पाचशे मते घेणा-या अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीचे चित्र बदलले होते.

त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच छोट्या-मोठ्या बंडखोरांच्या नाकदु-या काढत नेत्यांना फिरावे लागणार आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांत ७,९९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी शुक्रवारी पूर्ण झाली. सोमवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सर्वच राजकीय पक्षांत बंडखोरी झाल्याने सर्वत्र बंडाळी माजली आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत सुरू आहे. बंडखोरांची समजूत काढताना त्यांना विधान परिषदेवर संधी तसेच महामंडळे किंवा पक्षांतर्गत ‘बढती’ देण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे. या आश्वासनाला अथवा प्रलोभनाला न जुमानता काहींनी बंडखोरी कायम ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. मुंबईसह विविध ठिकाणी महायुतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीने कोणत्याही परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढती करायच्या नाहीत असे ठरवले आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात भाजपाच्याच राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली.

त्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना विशेष विमान पाठवून शिर्डीहून मुंबईला आणून त्यांची समजूत काढण्यात आली. महाविकास आघाडीमधील ९० टक्के बंडखोरांना शांत करण्यात यश आल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आणि कोण आपल्या भागातून लढतोय हे ओळखताना सर्वसामान्य नागरिकांच्या मेंदूचा पार भुगा उडणार यात शंका नाही. आघाडी आणि युतीमधील बंडखोरांनी विद्यमान आमदारांना आणि उमेदवारांना घाम फोडला आहे. पक्षीय उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकतात अशा बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. दिवाळीचे निमित्त साधून फराळाच्या निमित्ताने बंडोबांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्लॅन आखला जात आहे. अनेक बंडोबा माघार घेण्यास तयार नाहीत.

अनेकजण नेत्यांनाच आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. अडीच वर्षांत बदललेली राजकीय समीकरणे यामुळे उमेदवारी मिळवण्यात निर्माण झालेली अडचण हीच बंडखोरी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. नगरसेवकपदाची निवडणूक असो वा खासदार-आमदारकीची, एकदा निवडून येण्याची प्रत्येक पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असते. विधानसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारयादीत आपले नाव नसल्याचे पाहून अनेक इच्छुकांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. वंचित बहुजन आघाडीसह छोट्या पक्षांनाही बंडखोरीचा फटका बसला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडानंतर उमेदवार व बंडखोरांची संख्या वाढली आहे. काँग्रेसच्या काही बंडखोरांनी आमची मनधरणी करू नका, अपक्ष म्हणून लढणारच असे नेतृत्वाच्या कानी घातल्याचे सांगण्यात येते.

महायुतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार काही मतदारसंघांत परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत. काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढती’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. मतदारसंघ मित्र पक्षाला सोडल्याने आमचे राजकीय भवितव्य काय, असा सवाल बंडखोरांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असले तरी काही मतदारसंघांत एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सुरेश पांडुरंग बनकर (उद्धव ठाकरे गट), सुरेश पांडुरंग बनकर (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत. छ. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजू शिंदे (उद्धव ठाकरे), राजू शिंदे(अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर (काँग्रेस) यांच्या विरोधात राजेश वानखेडे नावाचे दोन उमेदवार उभे आहेत.

सांगली आणि तासगाव कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघांतही अशीच स्थिती आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची रणनीती आखल्याने मतांचे विभाजन होऊन प्रमुख उमेदवाराला फटका बसू शकतो. अशा प्रकारांमुळे राजकारणी सेवाभावी कमी पण सत्तालोभी जास्त असा जनतेचा समज झाल्यास त्यात गैर ते काय? मतदान देशविकासाची गुरुकिल्ली आहे. मत कोणाला द्यायचे हे आपल्या अंतरात्म्याच्या सल्ल्याने देशाच्या, मुलांच्या भवितव्यासाठी ठरविले जाते. म्हणून प्रत्येकाने त्यासाठी सतर्क असले पाहिजे. मतदान न करणे हा देशद्रोहच म्हटला पाहिजे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने शंभर टक्के मतदान करण्याचा ठाम निश्चय करावा आणि आपल्या लोकशाहीचा सन्मान करावा. तुमच्या एका अमूल्य मतात बंडोबांना थंड करण्याची आणि मुजोरवृत्तीची नशा उतरवण्याची शक्ती आहे हे लक्षात ठेवा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR