मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचारातील काही मुद्यांनी राजकारण फार तापले आहे. अशातच भाजपाचे नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान केलेले ‘कटेंगे तो बटेंगे’ हे वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. दुसरीकडे या वक्तव्यावरून महायुतीमध्येच बेबनाव सुरू असल्याचे विविध नेत्यांच्या माध्यमांमधील प्रतिक्रियांवरून दिसत आहे.
मोदी यांची महाराष्ट्रातील प्रचाराची शेवटची सभा गुरुवारी (१५ नोव्हेंबर) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात पार पडली. परंतु या सभेमध्ये त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या शब्दाचा उच्चार न करता, ‘एक है तो सेफ है’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. भाजपा नेते तथा खासदार अशोक चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी भाजपामध्ये असलो तरी सुद्धा धर्मनिरपेक्ष हिंदू आहे. मी नेहमी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी कधीही स्वत:ला हिंदुत्वापासून वेगळे केलेले नाही.
भाजपामध्ये सुद्धा हीच विचारधारा आहे की, आम्ही हिंदू आहोत. परंतु धर्मनिरपेक्ष असूनही भाजपामध्ये हिंदुत्व मानणारेही लोक आहेत,असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा पद्धतीची वक्तव्य ही उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये चालत असतील. परंतु महाराष्ट्रात चालणार नाहीत. महाराष्ट्र हे राज्य साधू-संत, शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे राज्य आहे. त्यांची शिकवण आमच्या रक्तात असून आम्ही त्याच मार्गावर चालत राहू, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क येथील राज्यातील शेवटची प्रचाराची सभा असताना अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
पंकजा मुंडे यांचे घुमजाव
भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे एका माध्यमाशी म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’यासारख्या घोषणा देण्याची आवश्यकता नाही. मी केवळ भाजपा पक्षाची आहे, म्हणून याचे समर्थन करणार नाही. विकास हाच खरा मुद्दा असून त्यावर माझा विश्वास आहे. प्रत्येक माणसासाठी जगण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे, ही त्या नेत्यांची जबाबदारी आहे. या कारणाने असे विषय महाराष्ट्रात आणण्याची काही गरज नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. परंतु त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. आपण अशा प्रकारचे वक्तव्य केले नसून मुद्रित माध्यमांमध्ये काय प्रकाशित झाले आहे? त्यावर आपण भाष्य करणार नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर -फडणवीस
‘बटेंगे तो कटेंगे’ या विषयावरून राजकारण तापू लागले असताना महायुतीमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर एका माध्यमाशी बोलताना भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराला दिलेला एक प्रकारे प्रतिसाद आहे. महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला ते उत्तर आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘वोट जिहाद’ करत प्रार्थनास्थळांवर पोस्टर लावण्यात आले. लोकांना विशिष्ट पक्षाला मत देण्याचे आवाहन केले. तर मग ही कुठली धर्मनिरपेक्षता आहे? पण या घोषणेचा खरा अर्थ आमच्या सहकारी मित्रांना समजू शकलेला नाही. याचा खरा अर्थ आपणाला सर्वांना एकत्र राहायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एक है तो सेफ है, अर्थात आपण एकत्र असलो तर सुरक्षित आहोत. त्याचा अर्थ आपण मुस्लिमांच्या विरोधात आहोत, असा होत नाही.