19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीयबथ्थड व्यवस्थेचे बळी!

बथ्थड व्यवस्थेचे बळी!

आपल्या महाशक्ती वा विश्वगुरू बनण्याचे स्वप्न उरात बाळगणा-या देशात एकाच आठवड्यात तीन घटना घडल्या! पहिली घटना प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून मिरवणा-या महाराष्ट्र राज्यातील डोंबिवलीच्या केमिकल फॅक्टरीतील भयंकर स्फोटाची! या घटनेत किमान १३ कामगारांचा अक्षरश: कोळसा झाला. एवढा की, मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणीचा आधार घेण्याची वेळ आली. या घटनेतील अजूनही काही कामगार बेपत्ता आहेत व अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दुसरी घटना घडली ती पंतप्रधान व गृहमंत्री यांचे गृहराज्य असणा-या गुजरात राज्यातील राजकोटमध्ये. राजकोटमध्ये उभारण्यात आलेल्या गेमिंग झोनमध्ये आग लागली आणि या गेमिंग झोनचा ‘डेथ झोन’ झाला! या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. ज्यात काही निष्पाप लहान मुलांचाही समावेश आहे. तिसरी घटना देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत घडली. राजधानी दिल्लीच्या विवेक विहार भागातील एका खासगी बाल रुग्णालयास आग लागून सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. या देशाच्या तीन वेगवेगळ्या भागात घडलेल्या तीन वेगवगळ्या घटना असल्या तरी त्यात एक साम्य नक्कीच आहे ते म्हणजे या तीनही घटनांत सुरक्षेचे उपाय व त्याची अंमलबजावणी हा विषय पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आला व ज्या सरकारी यंत्रणेवर याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे त्या यंत्रणेने आपले डोळेच मिटून घेतले होते.

म्हणजे डोंबिवलीतील घटनेनंतर यंत्रणा सांगते की, ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीने बॉयलर वापराची परवानगीच घेतली नव्हती. तर राजकोटमध्ये ज्या गेमिंग झोनमध्ये आग लागली त्या गेमिंग झोनने ते चालू करताना रीतसर परवाना काढला नव्हता की, महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेण्याची तसदी उचलली होती. राजधानीत आग लागलेल्या खासगी बाल रुग्णालयानेही अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नव्हते. एवढेच काय पण या रुग्णालयाच्या परवान्याची मुदत संपलेली असतानाही परवान्याचे नूतनीकरण न करताच ते सुरू ठेवण्यात आले होते आणि विशेष म्हणजे हे रुग्णालय एक बीएएमएस डॉक्टर चालवत होता. त्याला असे रुग्णालय चालविण्याचा अधिकार आहे की नाही? याची खातरजमाच आपल्या ‘कार्यक्षम’ यंत्रणेने केलेली नाही. थोडक्यात सार काय तर वरवर पाहता या तीनही घटना अपघात वाटत असल्या तरी त्यामागच्या प्रमुख कारणाचे एकच समान सूत्र आहे ते म्हणजे आपल्या यंत्रणेचा व व्यवस्थेचा बथ्थडपणा! नियम पाळण्यासाठी नव्हे तर ते मोडण्यासाठीच किंवा त्यात पळवाटा काढण्यासाठीच असतात, लाचखोरी करून भ्रष्ट यंत्रणेला आरामात खिशात घालता येते ही वृत्ती आपल्या बथ्थड व्यवस्थेत इतकी दृढ झाली आहे की, आताशा कोणाला त्याचे काही वाटेनासे झाले आहे!

जोवर दुर्घटना होत नाही तोवर सुरक्षा उपायांची पूर्तता व त्याची आवश्यक व नियमित तपासणी यावर साधी चर्चाही होत नाही आणि म्हणूनच या व अशा देशात घडणा-या असंख्य अपघातातील बळी हे अपघाताचे नव्हे तर आपल्या असंवेदनशील व बथ्थड बनलेल्या व्यवस्थेचे बळी आहेत. त्यामुळेच असे अपघात घडले की, काही काळ गरमागरम चर्चा होते. तोवर चौकशी समिती, दोषींवर कडक कारवाई, वगैरेच्या घोषणा होतात आणि एकदा का प्रकरण थंडबस्त्यात गेले की, सगळे काही थंडगार होते ते पुढची दुर्घटना होईपर्यंत! १३ जून १९९७ रोजी राजधानी दिल्लीतील ‘उपहार’ चित्रपटगृहाला आग लागून ६० जणांचा कोळसा झाला होता. तेव्हापासून आजवर देशात जेवढ्या केवढ्या अशा अपघातांच्या घटना घडल्या त्यावेळी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी युद्धपातळीवर कडक उपाययोजना करण्याच्या चर्चा व घोषणा झाल्या. मात्र, ना देशातले असे अपघात थांबले, ना त्यांची संख्या रोडावली. उलट उपहार अग्नीकांडातील आरोपी अन्सल बंधूंच्या निर्दोष मुक्ततेने अशा नियम, कायदे सर्रास पायदळी तुडवण्याच्या मनोवृत्तीला एवढे बळ दिले की, आज ही दृढ मनोवृत्ती हीच समाजासाठीची सर्वांत मोठी समस्या बनलेली आहे.

आपल्याकडे नियम, कायदे, विविध प्रकारच्या सुरक्षेचे मापदंड, त्याबाबतची मानके हे सगळे कागदी अलंकारच आहेत हेच देशात वारंवार घडणा-या अशा घटनांमध्ये सप्रमाण सिद्ध होते. अशा घटना-अपघातानंतर त्यामागे यंत्रणांच्या निष्क्रियतेचे, बेमुर्वतखोरपणाचे, भ्रष्टाचाराचे, बेफिकिरीचे पुरावे बाहेर येतात. नियम मोडणारे वा त्यात पळवाटा शोधणा-यांना यंत्रणेचे केवळ अभयच नाही तर अर्थपूर्ण सा हे ही उघडकीस येते. दोषींवर अत्यंत कडक कारवाईच्या घोषणा होतात पण अगदी अपवादानेही कुठल्या दोषीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाल्याचे पहायला मिळत नाहीच! विशेष म्हणजे त्याचे आपल्या कुणाला काही वाईट वगैरे वाटत नाही की, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी कुणी आग्रह वगैरे धरत नाही, रस्त्यावर उतरत नाही, आंदोलन करत नाही, बंदच काय पण साधा दुखवटाही पाळत नाही. व्यवस्थेचा हाच बथ्थडपणा, असंवेदनशीलता अशा अपघातांमध्ये बळी पडणा-या निष्पापांच्या प्राणहानीचे प्रमुख कारण आहे.

व्यवस्थेचा हा बथ्थडपणा जोवर दूर होणार नाही तोवर यंत्रणांमधील भ्रष्टाचार, बेफिकिरी, बेमुर्वतखोरपणा दूर होण्याची अजिबात शक्यता नाही. जोवर यंत्रणा जबाबदार व कार्यक्षम होत नाहीत तोवर यंत्रणांना हात ओले करून सहज खिशात घालता येते ही समाजात दृढ झालेली मनोवृत्तीही बदलणे केवळ अशक्यच! पुण्याच्या कल्याणीनगर भागात बड्या बापाच्या बिघडलेल्या बाळाने दारू ढोसून बेदरकारपणे गाडी चालवत दोन तरुणांचा घेतलेला जीव व त्यानंतर या ‘बाळाला’ वाचविण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागलेली यंत्रणा यांचे किळस आणणारे जे किस्से उघडकीस येतायत ते आपल्या बथ्थड व्यवस्थेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारेच आहेत! हे सगळे प्रकार पाहिल्यावर कोणी कितीही कायदा व सुव्यवस्थेच्या बाता मारल्या तरी आपला देश ‘रामभरोसे’च चालला असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात दृढ झाल्याशिवाय रहात नाही, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR