22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeसंपादकीय विशेषबदला घेतला; पुढे काय?

बदला घेतला; पुढे काय?

आठ ऑक्टोबर २०२३ च्या मध्यरात्री इस्रायलच्या अभेद्य सुरक्षाकवचाला भेदून आणि मोसाद या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन हमास नामक दहशतवादी संघटनेने भीषण हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीत जोरदार आक्रमण केले आणि आजही हा संघर्ष सुरूच आहे; पण विविध देशांच्या मध्यस्थीने हा युद्धसंघर्ष थांबवण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आलेले असताना, इराणच्या नवीन अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनिये याला कंठस्नान घातले. या हल्ल्याने इस्रायलने आपली ताकद दाखवून दिली असली तरी बदला आणि प्रतिबदला, हल्ला आणि प्रतिहल्ला यामुळे हा संघर्ष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धाचे ढग मध्यपूर्वेत सर्वदूर पसरले तर परिस्थिती प्रचंड बिकट होऊ शकते.

हमास-इस्रायलमधला संघर्ष एका टोकाला पोहोचला आणि त्याचे प्रत्यंतर तेहरानमध्ये झालेल्या एका हवाई हल्ल्यामध्ये दिसून आले. यामध्ये हमास प्रमुख नेता जो स्वत:ला पंतप्रधान म्हणवून घेत असे तो इस्माईल हनिये याच्यासह त्याचा अंगरक्षक यांना कंठस्नान घालण्यात आले. हा हल्ला इस्रायलनेच केला असे तेथील गुप्तहेर संघटनांचे म्हणणे. एक प्रमुख पॅलेस्टिनी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून इस्माईल हनिये याचा झालेला उदय हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. त्यानेच हमासचे संघटन केले आणि इस्रायलवर ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मोसादच्या हातावर तुरी देऊन त्यानेच छुपा हल्ला करविला होता. त्यामुळे तो इस्रायलच्या हिट लिस्टवर होता. एक मोस्ट वाँटेड अतिरेकी म्हणून अमेरिकेलाही तो हवा होता. इराणच्या नवीन अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी तेहरानमध्ये प्रमुख निमंत्रित म्हणून हनिये उपस्थित होता. खरेतर त्याचा मुक्काम कतारमध्ये असतो. परंतु नियतीने त्याच्यासमोर काही वेगळेच वाढून ठेवले होते. इकडे युद्धविरामाच्या गोष्टी चालू होत्या, शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर कतारमध्ये बोलणी चालू होती आणि तिकडे मात्र त्याच्या जीवनालाच पूर्णविराम देण्याची सर्व तयारी झाली होती. हनिये ज्या घरात उतरला होता त्या घरावर इस्रायलच्या विमानांनी अचूक हल्ला केला आणि ८ ऑक्टोबरच्या भ्याड आक्रमणाचा वचपा काढला.

हमासच्या राजकीय भवितव्याचा सर्वेसर्वा आणि केंद्रबिंदू असलेला इस्माईल हनिये याचा मध्यपूर्वेच्या राजकीय क्षितिजावरून अचानक अस्त झाल्यामुळे बदला आणि प्रतिबदला, हल्ला आणि प्रतिहल्ला याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. परंतु दुष्टचक्र मात्र संपलेले नाही. उलट या वर्तुळाचा परिघ आता अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. कारण इराणचे नेते आयातुल्ला खामेनी यांनीही बदला घेण्याची भाषा केली आहे त्याचे काय परिणाम होतील? या युद्धात आता मध्यपूर्वेतील इराण, ईजिप्त, तुर्कस्तान इत्यादी देश उतरण्याची शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या बाजूने जे कोणी उभे राहतील ते सारे इस्रायलच्या विरोधात काम करतील.

खुद्द अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी याबद्दल काहीही प्रतिक्रिया आणि भाष्य करण्यास नकार दिला असला तरीदेखील अमेरिकेने जाहीर केलेल्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यामध्ये हनिये यांचा समावेश होता हेही विसरता कामा नये. इस्रायलने आजवर इराणवर केलेल्या गुप्त कारवायांमध्ये चार अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत तसेच इराणला आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अनेकांना गमवावे लागले आहे. तथापि हनियेला ज्या पद्धतीने टिपण्यात आले त्यातून इस्रायल आणि मोसाद यांची युद्धपद्धती, युद्धयंत्रणा किती प्रगत आहे याची साक्ष जगाला पटली.
मागील ८ महिन्यांपासून इस्रायलने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि ९०,००० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे आणि अलिकडील काही हल्ल्यांमध्ये निष्पाप मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. हल्ला आणि प्रतिहल्ला आणि बदल्याची भावना किती टोकाची असू शकते हे या दोन्ही गटाच्या कडवट भूमिकेवरून लक्षात येते. खरेतर, थोडी मानवतावादी दृष्टी त्यांच्यामध्ये असती तर हे युद्ध केव्हाच थांबले असते. परंतु मुळातच ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जे घडले ते एवढे भयावह होते की, इस्रायलकडून याचा क्रूर बदला घेतला जाणार याची शक्यता होतीच. अखेर ती खरी ठरली.

इस्माईलच्या उदयाचा आलेख
इस्माईल हनिये हा मध्यपूर्वेच्या राजकारणात सर्व देशांना जोडून, सर्वांचे समर्थन मिळवून पॅलेस्टाईनच्या पाठीशी लोकशक्ती जोडणारा एक महत्त्वाकांक्षी नेता होता. तो कुशल संघटक व प्रभावी वक्ताही होता. गाझाच्या अल-शाती या निर्वासित छावणीत १९६३ साली इस्माईल हनियेचा जन्म झाला. निर्वासितांसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळेमध्ये तो शिकला आणि पुढे इस्लामिक विद्यापीठातून त्याने अरबी साहित्यात बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठात शिकत असताना तो हमास संघटनेचा सदस्य बनला आणि त्याला पॅलेस्टाईनचे राष्ट्रीयत्व आपण कडवटपणे जपले पाहिजे असे वाटू लागले. विद्यापीठात असताना निदर्शने, आंदोलने, चळवळी यात तो भाग घेऊ लागला व त्याच्या नेतृत्वाची जडणघडण झपाट्याने होत गेली.

हमासच्या लष्करी नेत्यांनी त्याला त्याच्या काही अग्रणी साथीदारासह लेबनॉनला पाठविले. ४०० कार्यकर्त्यांसमवेत लेबनॉनला पोहोचल्यानंतर त्याला आणखी पुढील कारवाया करणे सोपे झाले. १९९७ साली इस्रायलने हमासचे संस्थापक अहमद यासिन यांना सोडल्यानंतर हमासचे कार्य अधिक जोमाने सुरू झाले. तेव्हा हमासच्या अध्यक्षांनी आपल्या संघटनेच्या कार्यालयाची सर्व जबाबदारी पाहण्याचे काम तरुण इस्माईलवर सोपविली आणि त्याने एक पाऊल पुढे टाकले. २००५ मध्ये इस्माईलवर नव्या तरुण फळीचे नेतृत्व करण्याचे काम सोपविण्यात आले. पुढील महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याने चांगलेच यश मिळविले. २००६ च्या निवडणुका जिंकून इस्माईल हनिये पंतप्रधान बनले. ते नव्या प्राधिकरण सरकारचे पंतप्रधान होते. परंतु त्यांची कारकीर्द अल्प काळाची ठरली. २००७ मध्ये अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले. धुसफूस व अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू झाला आणि पुन्हा त्यांना पायउतार व्हावे लागले. हंगामी पंतप्रधान म्हणून दुस-या इंतिफादामध्ये इस्माईल हनिये यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि आपले नेतृत्व सिद्ध केले होते. परंतु मेहमूद अब्बास आणि हनिये यांच्यातील वाद चिघळला आणि त्यातून अध्यक्षांनी पंतप्रधानास बडतर्फ केले.

त्यातून एकमेकावर कारवाई करण्यात आली. १९९३ च्या ओस्लो समझोत्यानंतर हनियेची गाझापट्टीत वापसी झाली. ते परत आले. त्यांनी यशही मिळविले. पण ते त्यांना टिकविता आले नाही. ते जसे पंतप्रधान झाले तसे पॅलेस्टाईनचे भविष्य बदलावे, तेथे सामाजिक, आर्थिक सुधारणा आणाव्यात, राजकीय लोकशाही प्रक्रिया भक्कम करावी, या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी सारी ताकद इस्रायलविरुद्ध हालचाली करण्यात वापरली. ते पॅलेस्टाईनमध्ये लोकशाही आणू शकले नाहीत. सरकार स्थिर करू शकले नाहीत, विकासाला गती देऊ शकले नाहीत आणि सतत इस्रायलविरोधी द्वेष पसरविणे हा एकच कार्यक्रम त्यांनी चालविला. इस्माईलला अध्यक्षांनी बडतर्फ केले असले तरी तो स्वत:ला पंतप्रधान मानून हमासचे सरकार एकहाती चालवित होता. त्याला मध्यपूर्वेत गाझाचे सरकार म्हणून ओळखले जात होते. यावरून त्याची राजकीय शक्ती किती मोठी होती हे लक्षात येते. २००६ ते २०१७ पर्यंत गाझापट्टीचा सर्वेसर्वा आणि सुप्रीम नेता अशीच त्याची अवस्था होती. त्याची राजकीय शक्ती सतत वाढत गेली आणि त्याला हमासच्या राजकीय ब्युरोचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

इस्रायली लष्करी न्यायालयाने त्याला तुरुंगातही डांबले होते. परंतु सुटकेनंतर तो पुन्हा अधिक मुक्तपणे राजकीय कार्य करू लागला. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला इस्माईल हनियेच्या सर्व हालचालींची माहिती होती. आताही त्याच्या निवासाची संपूर्ण बारीकसारीक माहिती मिळविली आणि त्याचे लोकेशन आपल्या गुप्त यंत्रणांना पाठविले. त्यामुळे त्याच्या ठावठिकाण्यावर अचूक मारा करणे इस्रायलला शक्य झाले. हमासच्या राजकीय पटलावर झालेला इस्माईल हनिये याचा उदय आणि अस्त पाहता, खरेतर त्यांनी मध्यरात्री केलेला इस्रायलवरील हल्ला ही एक मोठी चूक होती. या पद्धतीचा कट रचताना दहा वेळा विचार करणे आवश्यक होते पण त्यांनी तसे केले नाही. याऐवजी त्यांनी शांतता व सुसंवाद असा मार्ग स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती. इस्रायलने प्रथम त्याच्या कुटुंबातील १४ लोकांना यमसदनास पाठविले आणि अखेर म्होरक्या असलेल्या इस्माइल हनिये याचाही काटा काढला. त्याचे हे गनिमी काव्याचे तंत्र चकित करणारे ठरले आहे. हिजबुल्लाहचा एक मुख्य कमांडर फुआद शुकर याला यमसदनी धाडल्यानंतर दुस-याच दिवशी इस्माईलला मोसादने टिपले.

गाझापट्टी कोणाची?
हनिये याच्या हत्येनंतर युद्धाच्या तिस-या टप्प्यामध्ये इस्रायलने दक्षिण गाझापट्टीत मुसंडी मारली आहे. आता इस्रायलचा प्रयत्न संपूर्ण गाझापट्टीवर ताबा मिळविण्याचा आहे. पण जग त्याला किती मान्यता देईल हा खरा प्रश्न आहे. कारण पॅलेस्टाईनचे राजकीय अस्तित्व नाकारता येणार नाही. इस्माईलच्या हत्येमुळे इराणलासुद्धा युद्धामध्ये गोवण्याचा इस्रायलने प्रयत्न केला आहे काय? आता जर इराणने प्रत्यक्ष बदल्याची कारवाई केली तर युद्धाचे वर्तुळ अधिक विस्तारण्याचा धोका आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्माईल हा हमासच्या दृष्टीने प्रतिकाराचे व संघर्षाचे प्रतीक बनेल आणि असंख्य पॅलेस्टिनी त्याचे नाव घेऊन इस्रायलबरोबर संघर्ष करण्यासाठी पुन्हा तयार होतील, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

इस्माईल हनियेची हत्या विश्वासघातकी झिओनिस्ट हल्ला आहे असे इराणमधील कडव्या नेत्यांना वाटते. त्यामुळे इराणची पुढची चाल पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिका सध्या तटस्थ आहे. याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. परंतु अमेरिकेची याला मूक संमती आहे असे म्हणता येईल का? तिसरी गोष्ट म्हणजे या प्रकारानंतर रशिया, तुर्कस्तान ईजिप्त हे देश काय भूमिका घेतात यावर युद्धक्षेत्र किती लांबते हे ठरणार आहे. युद्धाचे परीघक्षेत्र लांबू नये, युद्ध थांबावे, युद्धविराम ताबडतोब घडावा असे भारतासह जगातील प्रमुख नेत्यांना वाटते. पण दुर्दैवाने अमेरिकेची भूमिका दुटप्पी राहिली आहे. नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. भावी अध्यक्ष निवडणुकीतील दोन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस दोघांना लोटांगण घालून त्यांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला.

यापैकी कमला हॅरिस पुन्हा निवडून आल्या तर त्या बायडेन यांचे धोरण चालू ठेवतील. पण ट्रम्प पुढे आले तर ते मात्र इस्रायलला युद्ध सामर्थ्य किती पुरवतील हा प्रश्न पडतो. बदला आणि प्रतिबदला, हल्ला आणि प्रतिहल्ला हे दुष्टचक्र किती काळ चालेल? त्यामुळे हा संघर्ष जगातील तिस-या महायुद्धाची नांदी ठरले काय? युद्धाचे ढग मध्यपूर्वेत सर्वदूर पसरले तर मग युद्ध आवरणे अवघड जाईल. हमास-इस्रायल आणि नाटो व रशिया यातील संघर्षाचे राजकारण पाहता असे दिसते की, मध्यपूर्वेतील बहुतेक देशांमध्ये अस्थिरता आहे. कारण तेथे राज्य करणारे राज्यकर्ते आणि शासन चालविणारे दहशतवादी गट अशा दोन भिन्न यंत्रणा आहेत. राज्य एकाचे चालते व सरकार मात्र दहशतवादी चालवितात. अशाच प्रकारचे राजकारण सुएझ कालव्यात हुथी बंडखोर करीत आहेत. या प्रकारच्या यंत्रणा लोकशाही देशामध्ये जेव्हा वाढतात, तेव्हा तेथील लोकशाही व्यवस्था मोडकळीस येते. खरेतर मध्यपूर्वेतील देशामध्ये अंतर्गत कटकारस्थाने व यादवी तसेच बंडाचे प्रकार टाळून स्थिर लोकशाही सरकार देण्यावर भर दिला पाहिजे.

-प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR