कोल्हापूर : एसटीची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी प्रवाशांना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरवून गेलेल्या चालकाने महिलेच्या आठ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत चालक सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, जि. सातारा) याला अटक केली आहे.
प्रवासी महिला राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, रा. ठाणे, मूळ हुक्केरी, बेळगाव) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथून बेळगावकडे निघालेली एसटी बस सोमवारी पहाटे मध्यवर्ती बसस्थानकावर आली. एसटीची किरकोळ दुरुस्ती असल्याचे सांगून प्रवाशांना उतरविण्यात आले.
यावेळी प्रवाशांचे साहित्य बसमध्येच होते. एसटी वर्कशॉपमधून काही वेळाने फलाटावर गाडी आली असता त्यात फिर्यादी राजश्री नलवडे यांची पर्स मिळून आली नाही. त्यांच्या पर्समधील सोन्याचा हार, कानातील कुड्या, वेल असे आठ तोळ्यांचे दागिने नसल्याचे लक्षात येताच त्यांनी एसटी थांबवली.
बोलण्यातील विसंगतीवरून उलगडा
दागिन्यांची पर्स गेल्याने फिर्यादी नलवडे भांबावून गेल्या. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलावले. शाहूपुरी पोलिसांनी बसमधील प्रवाशांकडे चौकशी केली. यानंतर वर्कशॉपमध्ये जाऊन विचारणा केली असता एसटी दुरुस्तीसाठी आलीच नसल्याचे समोर आले. पोलिसांनी चालकाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती येत होती.
प्रश्नांचा भडिमार करताच कबुली
चालक शिंदे याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करताना पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार करताच त्याने चोरीची कबुली दिली. या प्रकारामुळे अन्य प्रवाशांना मात्र मन:स्ताप सहन करावा लागला. संशयिताला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता चालकाची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.