अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील ढाळेगाव येथील महावीर विश्वनाथ गुंठे या ३५ वर्षीय युवकाचा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वाजताच्या दरम्यान ढाळेगाव – खंडाळी रोडवर एस.टी. बसचा अपघात होऊन तरुणांचा जागीच अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सकाळी साधारणत: ८ वाजता चाकूर -परभणी जाणारी बस व्हाया किनगाव-अंधोरी – ढाळेगाव- खंडाळी मार्गे जात असताना ढाळेगावपासून पाचशे मीटर अंतरावर खंडाळी रोडवर महावीर गुंठे यांच्या दुचाकी व गंगाखेड आगाराच्या (क्रमांक एम एच २० बी एल १७७८) बसचा अपघात झाला. सकाळी शेतातून घरी परतत असताना हा अपघात झाला. रस्ता एकेरी वाहतुकीचा असून रोडच्या दोन्ही बाजूस ओ.एफ.सी. केबल टाकण्यासाठी खोदकाम करून थातूर-मातूर बुजवण्यात आले होते. त्यामुळे समोरासमोर अपघात झाला असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अपघात एवढा भीषण होता की महावीर गुंठे यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. एस टी बसच्या वाहकाच्या बाजूने एसटीचा पत्रा तुटून महावीर गुंठे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला.
या घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील श्रीरामे व सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महावीर गुंठे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालय अंधोरी येथे पाठवून दिले आहे. त्याचबरोबर अहमदपूर आगाराचे देशमुख यांनीही घटनास्थळास भेट देऊन अपघातग्रस्त बस किनगाव पोलीस ठाण्यास पाठवून दिली आहे. महावीर गुंठे हे शेतीबरोबरच प्राणिमित्र व सर्पमित्र म्हणून परिचित असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत समजताच सर्वत्र हळ-हळ व्यक्त केली जात आहे.