29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगला देशाकडे ८४.६ दशलक्ष डॉलर्सचे बिल थकित

बांगला देशाकडे ८४.६ दशलक्ष डॉलर्सचे बिल थकित

अदानी पॉवरचा अल्टिमेटम, वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट होणार, दिली ४ दिवसांची मुदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगला देशाकडे अदानी पॉवरचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले आहे. अदानी पॉवरचे बांगला देशाकडे थकित असलेले एकूण बिल हे ८४.६ दशलक्ष डॉलर्स इतकेआहे. त्यामुळे हे थकीत वीज बिल भरण्यासाठी अदानी पॉवरकडून बांगलादेशाला ४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. थकीत वीज बिलाचे पैसे न दिल्यास अदानी पॉवर बांगलादेशाची वीज खंडित करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.

अदानी पॉवर झारखंड लिमिटेड या कंपनीचे तब्बल ८४.६ दशलक्ष डॉलर्सचे बिल थकल्यामुळे बांगलादेशाला करण्यात येणारा वीजपुरवठा निम्म्याने कमी केला होता. एवढेच नव्हे तर ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा इशारा कंपनीने दिला होता. मात्र, अदानी पॉवर झारखंड लिमिटेड कंपनीच्या इशा-यानंतर बांगलादेशाने तातडीने पावले उचलत हे थकीत वीज बिल भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

अदानी पॉवरचे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्याने त्यांनी बांगला देशावर दबाव आणायला सुरुवात केली. यासंदर्भात बांगला देशाला तातडीने हे थकीत वीज बिल लवकरात लवकर भरण्यासाठी सांगत ४ दिवसांची मुदत दिली. तसेच बांगलादेशाला पुरवण्यात येणा-या एकूण वीज पुरवठ्यात निम्म्याने घट केली होती. त्यामुळे लोकांना देखील मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने आता बांगला देश सरकारकडून तातडीने हे बिल भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

बांगलादेश सध्या विजेच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे याचे अनेक दुष्परिणाम बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतात. भारतातून १,६०० मेगावॅट गोड्डा प्लांटमधून ढाक्याला वीज निर्यात करणा-या अदानी पॉवरने वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाच्या आयातीतील आव्हानांना तोंड देत थकबाकी मिळविण्याची अंतिम मुदत बांगलादेशाला निश्चित केली आहे. गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपनीने या महिन्यात बांगला देशाला करण्यात येणारा वीजपुरवठा सुमारे १,४०० मेगावॅटवरून ७०० ते ८०० मेगावॅटपर्यंत कमी केला असल्याची माहिती बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिका-याने रॉयटर्सला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

वीज पुरवठ्यात कपात
एकीकडे वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलेला असतानाच बांगला देशाला होणा-या वीज पुरवठ्यात काही अंशी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बांगला देशाला एका रात्रीत १,६०० मेगावॅटपेक्षा जास्त वीजटंचाईचा सामना करावा लागला. १,४९६ मेगावॅटचा बांगलादेशी प्लांट आता ७०० मेगावॅटवर कार्यरत आहे. त्यामुळे सध्या बांगलादेशाला वीज कपातीचा समाना करावा लागत आहे.

विजेचे संकट गंभीर
गेल्या काही दिवसांपासून बांगला देशासमोर विजेचे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर बांगला देशात नवीन सरकार स्थापन झाले. आता नव्या बांगला देश सरकारला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच वीज बिल थकल्याने वीज संकट आणखी गहिरे होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR