परभणी/प्रतिनिधी
जुन्या शेतीच्या वादावरून तक्रार का दिली या कारणावरून तक्रारकर्त्याच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे घडली होती. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन मुलांना ३ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ३ .अ.अ.अ. शेख यांनी सर्व साक्षी पुराव्याचे अवलोकन करून दि.५ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे दि.२६ जुलै २०१८ रोजी पिडीत महिला ऊसाला पाणी देत होती. यावेळी आरोपी ज्ञानोबा येवले, शिवाजी ज्ञानोबा येवले, राजेभाऊ ज्ञानोबा येवले यांनी जुन्या शेतीच्या वादावरून तक्रार का केली या कारणावरून तक्रारकर्त्याच्या पत्नीला मारहाण केली. तिच्या हातापयाला धरून कापसाचे शेतात उचलून नेवून तिला जमिनीवर खाली पासून तिची साडी ओढू लागले परंतू पिडीतेने विरोध केला असता आरोपी ज्ञानोबा येवले यांनी पिडीतेला खतम करून टाकतो असे म्हणून तिच्या डोक्यात विळ्याने वार केला परंतू तिने तो चुकवल्याने हाताला लागला व गंभीर जखमी झाली.
त्यानंतर तिला खाली पाडून लाथा बुक्याने व काठीने मारहाण करण्यात आली. तसेच गळ्यातील मंगळसुत्र व ब्लाऊज मधील मोबाईल काढून घेतला अशी तक्रार पिडीत महिलेने पाथरी पोलिस स्टेशनला दिली होती. याचा तपास सपोउपनि. जे.एम. सय्यद यांनी केला. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच पिडीता व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश ३ श्री अ.अ.अ. शेख यांनी सर्व साक्षी व पुराव्याचे अवलोकन करून दि.५ रोजी आरोपी ज्ञानोबा येवले, शिवाजी येवले, राजेभाऊ येवले यांना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास. कलम ३२६ अन्वये ३ वर्षे सश्रम व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड कारावास, कलम ३२३ अन्वये १ वर्षे सश्रम कारावास व १००० रूपये दंड, कलम ३२५, ३४ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ३००० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांचे मार्गदर्शनाखाली अॅड. नितीन खळीकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि. सुरेश चव्हाण, दिलीप रेंगे, अंमलदार प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.