यवत : प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्याचे नाटक करून चुलतीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हा कट उघड झाला. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
७ डिसेंबर २०२४ रोजी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती त्यानुसार पुतण्या अनिल धावडे यांनी तक्रार दिली होती. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी पंचनामा केला होता. तर महिलेला झालेल्या जखमा नक्की कशामुळे झाल्या यासाठी व्हीसेरा तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून खरी घटना उघडकीस आणली आहे.