मध्य प्रदेशातही २ चिमुकले दगावले
पाटणा : वृत्तसंस्था
बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून, राज्यात विविध भागांत तीन दिवसांत उष्माघाताने ३८ जणांचा बळी गेला आहे. यापैकी ८ जणांचा काल मृत्यू झाला. उष्माघातामुळे अनेक नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातही उष्णतेचा कहर सुरू असून, तेथे दोन चिमुकले दगावल्याचे वृत्त आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशात ब-याच भागात तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बिहारमध्ये तर उष्णतेच्या लाटेत ५०० पेक्षा जास्त नागरिक बेशुद्ध पडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बेशुद्ध पडल्याच्या घटना वाढल्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील २४ तासांतही वातावरणात फारसा फरक पडणार नसल्याने नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बिहारमध्येही याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे बुधवारी सदर औरंगाबाद रुग्णालयात १३ जणांचा उष्माघाताने बळी गेला. उष्णतेचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासोबतच कैमूर, गया, रोहतास आदी ठिकाणीही प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी आणि महिलेचाही समावेश आहे.