29.1 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रबीडच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

बीडच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

नागपूर :
आमदार क्षीरसागरांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान, नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा बीड आणि परभणीतील घटनांमुळे गाजला. मंगळवारी (ता. १७ डिसेंबर) दुस-या दिवसाचे कामकाज सुरू होण्याआधीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून विधान भवनात विरोधकांनी आंदोलन केले. यानंतर हाच मुद्दा विरोधकांकडून विधानसभेतही उपस्थित करण्यात आला.

विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा मुद्दा बुधवारी (ता. १८ डिसेंबर) चर्चेसाठी घेण्यात येईल, असे म्हटले. तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी औचित्याच्या मुद्दा याच्या अंतर्गत हे प्रकरण विधानसभेत मांडले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले. त्यांना हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर विरोधकांकडून बीड सरपंच हत्याप्रकरणावरून सभात्याग केला.

काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सुरुवातीला बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा मांडला. परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (ता. १८ डिसेंबर) चर्चेसाठी घेण्यात येईल, असे म्हटले. परंतु, हे प्रकरण गंभीर असून राज्य सरकारने तत्काळ या प्रकरणी चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळत या प्रकरण बुधवारी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. ज्यानंतर औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत म्हटले की, गडचिरोलीतील नक्षलवादाचे आव्हान स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी तेथील पालकमंत्री पद स्वीकारले होते. तसेच आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पॅटर्नचा बीमोड करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

तसेच, बीड जिल्ह्यात एका सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अद्याप आरोपी सापडला नाही. आरोपी वाल्मिकी कराडला दोन दोन सुरक्षा रक्षक आहेत. जिथे आमदाराला एक सुरक्षारक्षक मिळतो तिथे आरोपीला दोन सुरक्षारक्षक आहेत. बीड येथील या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिकी कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्यावर खुनाचा कट आणि खुनाचा गुन्हा नोंदविला नाही. या आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास त्याचा या हत्याकांडातील सहभाग स्पष्ट होतो, असा आरोपच आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.

अत्यंत क्रुर पद्धतीने बीडमध्ये या सरपंचाची हत्या झाली आहे. चांगले काम करणा-या सरपंचाचे डोळे जाळण्यात आले, आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक झाली नसल्याचा मुद्दा नमिता मुंदडा यांनी मांडला. तसेच, आरोपीला अटक करून फासावर लटकाविण्याची मागणीही केली. जिल्ह्यात संतापाचे वातावरण असल्याचेही त्या म्हणाल्या. तर, बीड आणि परभणीतील घटनेचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याची नाना पटोले यांनी सांगितले आणि विरोधकांनी सभात्याग केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR