23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रबीड, परभणीच्या घटनांचे विधानसभेत संतप्त पडसाद

बीड, परभणीच्या घटनांचे विधानसभेत संतप्त पडसाद

– विरोधक आक्रमक, राज्य सरकारची चर्चेची तयारी
-संविधानाचा अपमान सहन करणार नाही : फडणवीस

नागपूर : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या व परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना या घटनांचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मराठवड्यातील या दोन जिल्ह्यात घटना घडल्याचे सांगत या प्रकरणी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच या घटनांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या घटनेने शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रक्षुब्ध झाले आहेत. या घटनेचा निषेध करताना आंदोलनाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले तर बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर देशमुख यांच्या हत्येचा संशय आहे. हत्येच्या घटनेनंतर बीडमध्ये ठिकठिकाणी बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. नाना पटोले यांनी आज विधानसभेत मराठवाड्यातील या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले.

संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि सरपंचाची हत्या या दोन्ही घटना भाजप सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी आणि राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्यावर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी पटोले यांनी केली. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा नियमावर बोट ठेवत आज शोकप्रस्ताव असल्याने स्थगन प्रस्ताव मांडता येणार नसल्याचे सांगत पटोले यांची मागणी फेटाळली.

त्यावर राज्य सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. बीड आणि परभणी येथील घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत फडणवीस यांनी संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे बजावले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR