मुंबई : बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालक आणि शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. पीडित मुलीने व तिच्या आईने हिंमत दाखवून आरोपींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर विजय पवार, खाटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणा-या या घटनेबद्दल पालकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. विधिमंडळात या विषयावर हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला आयपीएस अधिका-यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.
गुरू-शिष्याच्या प्रतिमेला बीडमधील घटनेने काळे फासण्याचे काम केले आहे. पीडित मुलीने आणि तिच्या आईने नराधम संस्थाचालक आणि शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले. आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून व्यवस्थित सुरू नसल्याचा आरोप केला जात आहे. आरोपींना अटक होऊन पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद असताना फक्त दोन दिवसांचा पीसीआर कसा मागितला गेला? असा सवाल आमदार तुपे यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. आरोपींच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? याचा शोध घेऊन सखोल चौकशी सरकार करणार आहे का? एसआयटी नेमली जाईल का?
इतर मुलींच्या बाबतीत असा काही प्रकार घडला का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे मुद्दे आमदार तुपे यांनी सभागृहात मांडले. यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच बीड लैंगिक अत्याचार प्रकरणाची आयपीएस महिला अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती नेमूण चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. हिमतीने मुलीने व तिच्या आईने तक्रार दिल्याने पोस्को अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंद झाला आहे. दोन दिवसांची पीसीआर का? याची चौकशी केली जाईल. इतर मुलींसोबत असा काही प्रकार घडला का? याची चौकशी त्यांना विश्वासात घेऊन केली जाईल. आरोपींना कोणाचा राजकीय वरदहस्त असेल तर त्याचा तपास करून त्यांनाही शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.