पाच जणांना झाला लाभ, एकाला मिळाली दृष्टी
नांदेड : प्रतिनिधी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका बँक अधिका-याचे ब्रेनडेड झाले. त्यांच्या पश्चात पतीच्या शरीराचा कोणाला तरी उपयोग व्हावा, याचा विचार करून पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळपर्यंत ग्रीन कॉरडोर करण्यात आले आणि अपघातग्रस्त युवकाचे यकृत, हृदय विमानाने तर दोन किडनी छत्रपती संभाजीनगर येथे रस्ते मार्गाने पाठवण्यात आल्या. याशिवाय दोन डोळे हे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला दान करण्यात आले.
अपघातामुळे ब्रेनडेड झालेल्या बँक अधिकारी अभिजित अशोक ढोके (३७) यांच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवनदान व एकास दृष्टी मिळाली. नांदेडमधअये आतापर्यंत सहाव्यांदा ग्रीन कॉरिडोर झाले असून, ते यशस्वी झाले. माळाकोळी (ता. लोहा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अभिजीत ढोके हे सहायक व्यवस्थापक पदावर होते. २९ जून रोजी ते कर्मचा-यांसह कारने माळाकोळी येथील हिराबोरी ते लांडगेवाडी मार्गावरून जात असताना भीषण अपघात झाला. त्यांचे ब्रेनडेड झाल्याने कुटुंबीयांच्या परवानगीने अवयवदान करण्यात आले.