बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबा गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम गुरुवारी होत आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी महंत नामदेव शास्त्री पुढाकार घेणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीबद्दल महत्त्वाचे विधान केले.
आमदार सुरेश धस म्हणाले की, संत भगवान बाबा नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावांत होतो. या वर्षी हा मान माझ्या मतदारसंघातील गावाला मिळाला. गेल्या सात दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे. त्यासाठी लाखो लोक राज्यभरातून या ठिकाणी आले आहेत. भगवानबाबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कार्यक्रमात तुमचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे येत असल्याबद्दल आमदार सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, भगवानबाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा येतील. भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही. भगवानबाबा यांच्यापुढे काहीच नाही. येथे नामदेव शास्त्री, भगवानबाबा इतकेच आहे. धनंजय मुंडे आणि आमचे राजकीय युद्ध बाहेर असणार आहे. या ठिकाणी भगवानबाबा यांचा आशीर्वाद घ्यावा, इतकेच आहे.