भाजप ठरवेल त्या नेतृत्वाला पाठिंबा : शिंदे, आज दिल्लीत बैठक
मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत एवढा मोठा जनादेश मिळाल्यामुळे बिहार पॅटर्न प्रमाणे त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद ठेवावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने झालेली कोंडी अखेर आज फुटली. गेले ३ दिवस मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ठरवतील, त्या नावाला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे जाहीर केले. आपण स्वत: काल या दोघांना फोन करून आपला सत्ता स्थापनेसाठी माझ्याकडून कोणतीही अडचण नसेल, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे सांगितल्याचे शिंदे म्हणाले. उद्या रात्री दिल्लीत अमित शाह यांच्याकडे बैठक होणार असून, त्यात सर्व निर्णय होतील, असे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी माघार घेतल्याने भाजपाचा मार्ग मोकळा झाला असून, फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळूनही मुख्यमंत्रिपदासाठी सुरू झालेल्या रस्सीखेचीमुळे अजूनही नवीन सरकार येऊ शकलेले नाही. भाजपा आमदार व संघ परिवार मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे, यावर ठाम होते तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आपला आग्रह सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी अखेर आज फुटली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, त्याला आपला पाठिंबा असेल, असे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत जनतेने सरकारच्या कामाला मोठी पसंती दिली. आमचा अभूतपूर्व असा विजय झाला. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, असे शिंंदे यांनी नमूद केले. निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले. ७०-८० सभा घेतल्या. मी आधीदेखील कार्यकर्ता म्हणून काम केले. पुढे देखील करेन, असे ते म्हणाले.
आम्ही रडणारे नाही, लढणारे
मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मीदेखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, माझ्या कामाबद्दल मी समाधानी आहे. कोणत्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, तर लढणारे लोक आहोत.
पंतप्रधान मोदी, शाह
निर्णय घेतील तो मान्य
निकालानंतर नवीन सरकार बनवायला वेळ लागत होता. त्यामुळे मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोन केला. सरकार बनवण्यात माझा कोणताही अडथळा नाही. माझा कोणताही अडसर नाही. त्यामुळे तुम्ही मोकळेपणे निर्णय घ्या, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांना सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
फडणवीस, पवार,
शिंदे आज दिल्लीत
गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्याकडे आमची बैठक होणार आहे. मी स्वत:, अजित पवार, फडणवीस या बैठकीसाठी जाणार आहोत. या बैठकीत आम्ही सरकार संदर्भात निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महायुतीचे आणि एनडीएचे प्रमुख म्हणून त्यांचा निर्णय भाजपसाठी अंतिम असेल, तसा तो आमच्यासाठीही अंतिम असेल. लोकांनी दिलेल्या प्रचंड यशामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. भाजपचा, महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो काही निर्णय घेतील, त्यासाठी आमचे समर्थन आहे, असे शिंदे म्हणाले. आपण उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी होणार की नाही, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. मात्र ते उपमुख्यमंत्री होतील, असे निकटवर्तीयांनी सांगितले.
फडणवीस यांच्याच
नावावर शिक्कामोर्तब?
शिंदे यांनी माघार घेतल्याने भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाकडून माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आघाडीवर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्यांच्या नावासाठी आग्रही आहे. त्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु मोदी-शाह यांनी आजवर अनेकदा धक्का तंत्र वापरले आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले तेव्हा शिवराजसिंह चौहान यांच्या नावावर मोहोर उमटणार असे सगळे गृहीत धरून चालले होते. पण मध्य प्रदेश व राजस्थान या दोन्ही राज्यात अचानक नवीन नावे पुढे आली. त्यामुळे फडणवीस यांचे नक्की असले तरी तसे ठामपणे सांगण्याचे धाडस कोणी करत नाही.