34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयभाजप नेते दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी अडकरणार लग्नबंधनात!

भाजप नेते दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी अडकरणार लग्नबंधनात!

कोलकाता- पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. ते आपली पक्ष सहकारी रिंकू मजूमदार यांच्याशी विवाह करत आहेत. हा विवाह आज, १८ एप्रिल २०२५ रोजी कोलकात्यातील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. ६० वर्षीय दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. सूत्रांनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष आणि देबांगशु भट्टाचार्य यांच्यासह अनेकांनी या प्रसंगी दिलीप घोष यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिलीप घोष यांच्या निकटवर्तीयांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, दोघांची भेट सकाळच्या फिरण्यादरम्यान झाली आणि कालांतराने त्यांचे नाते दृढ झाले. न्यू टाउन येथे खासगी समारंभात हा विवाह होणार असून, यात जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, विवाहाचा प्रस्ताव वधू पक्षाकडून आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सकाळी घोष यांच्या न्यू टाउनमधील निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. एका निकटवर्तीय भाजप नेत्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल सामन्यादरम्यान दिलीप घोष आणि त्यांच्या होणा-या पत्नीने एकत्र हजेरी लावली होती, त्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

माझ्या आईला माझे लग्न हवे होते

दिलीप घोष यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले, ‘‘माझ्या आईला माझे लग्न व्हावे अशी इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत मी विवाह करत आहे. मी यापूर्वीप्रमाणेच सक्रिय राजकारणात राहीन. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा माझ्या राजकीय कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही. रिंकू मजूमदार या दीर्घकाळापासून भाजप कार्यकर्त्या आहेत. त्यांनी पक्षाच्या महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, हातमाग कक्ष आणि इतर महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. रिंकू यांचे हे दुसरे लग्न असून त्यांना एक मुलगा आहे, जो कोलकात्यातील सॉल्ट लेक येथे आयटी कंपनीत कार्यरत आहे.

दिलीप घोष यांच्याबद्दल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे दिलीप घोष तरुण वयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१५ मध्ये भाजपमध्ये सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी देशभरात संघाच्या विविध भूमिकांमध्ये काम केले. पश्चिम बंगालमध्ये भाजपला माकपच्या जागी मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थापित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. खडगपूरचे माजी खासदार असलेले दिलीप घोष यांच्याकडून पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका अपेक्षित आहे.

हत्यार बाळगण्याचे आवाहन

नुकतेच दिलीप घोष यांचे एक वक्तव्य चर्चेत आले होते, ज्यात त्यांनी कथितपणे हिंदू समुदायाला घरी हत्यारे बाळगण्याचे आवाहन केले होते. वक्फ कायद्याविरोधातील हिंसाचारादरम्यान हिंदूंच्या घरांना लक्ष्य केल्याच्या बातम्या होत्या. मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधातील निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर २४ परगना येथील एका जाहीर सभेत घोष यांनी कथितपणे म्हटले, ‘‘हिंदू टीव्ही, फ्रिज, नवे फर्निचर खरेदी करत आहेत, पण त्यांच्या घरी एकही हत्यार नाही. काही घडले तर ते पोलिसांना बोलावतात. पण पोलिस तुम्हाला वाचवणार नाहीत.’’ असे ते म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR