क्वालालंंपूर: वृत्तसंस्था
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय अंडर १९ महिला संघाने विजयी सलामी दिली आहे.
साखळी फेरीतील वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना भारतीय संघाने २६ चेंडूत जिंकला. क्वालालंपूरच्या बायुएमास ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय अंडर १९ संघाची कॅप्टन निक्की प्रसाद हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय युवा गोलंदाजी युनिटनं आपल्या कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडिज संघाचा डाव १३.२ षटकात ४४ धावांत आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना एक विकेट गमावत भारतीय संघाने २६ चेंडूत मॅच संपवली.
फक्त दोघींनीच गाठला दुहेरी आकडा
पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडिज संघाकडून सलामीची बॅटर असाबी कॅलेंडर हिने २० चेंडूत केलेल्या १२ धावा आणि केनिका कॅसर हिने २९ चेंडूत केलेल्या १५ धावा वगळता कॅरेबियन ताफ्यातील अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून परूनिका सिसोदिया हिने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तिच्याशिवाय जोशिथा आणि आयुषी शुक्ला हिने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिज संघाने आपल्या तीन विकेट्स या रन आउटच्या स्वरुपात गमावल्या.
पाचव्या षटकातील दुस-या चेंडूवर फिनिश केली मॅच
अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना गोंगाडी त्रिशा आणि जी कमलिनी या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. त्रिशा २ चेंडूत ४ धावा काढून माघारी फिरल्यावर कमलिनी आणि सानिका चाळकेने संघाला पाचव्या षटकातील दुस-या चेंडूवरच विजय मिळवून दिला. कमलिनी हिने १३ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने नाबाद १६ धावांची खेळी केली. दुसरीकडे सानिकाने ३ चौकाराच्या मदतीने ११ चेंडूत १८ धावा कुटल्या.