हैदराबाद : वृत्तसंस्था
हैदराबादमध्ये सुरू असलेल्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेमधून मिस इंग्लंड २०२४ ‘मेला मॅगी’ यांनी वैयक्तिक आणि नैतिक कारणांचा हवाला देत स्पर्धेतून माघार घेतली. त्यांनी आयोजक आणि स्पर्धेतील वातावरणावर गंभीर आरोप केले असून, आपल्या अनुभवाविषयी सांगताना त्यांनी म्हटले की, ‘मला मिस वर्ल्ड स्पर्धेत वेश्या असल्यासारखे वाटले’.
या प्रकारानंतर तेलंगणाचे नेते के. टी. रामा राव यांनी यावर प्रतिक्रिया देत या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, महिलांवर अशा प्रकारचा दबाव हा पूर्णपणे निषेधार्ह आहे.
२४ वर्षांची मेला मैगी ७ मे रोजी भारतात आली होती. मात्र, १६ मे रोजी त्यांनी अचानक हैदराबाद सोडले आणि यूकेला परत गेल्या. ‘द सन’ या ब्रिटीश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत मेला मॅगी यांनी सांगितले की ‘‘मी इथे काही वेगळं करायला आले होते. मात्र, आम्हाला मदारीच्या माकडासारखं वागवण्यात आलं. नैतिकदृष्ट्या मी त्याचा भाग होऊ शकत नव्हते. गेस्टना खूश ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली जात होती. हे सगळं मला अत्यंत अपमानजनक वाटलं, असेही मेला मॅगी म्हणाल्या. मॅगीच्या जागी आता मिस इंग्लंडची रनर-अप चार्लेट ग्रांट या स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतील. याच स्पर्धेत भारताकडून नंदिनी गुप्ता सहभागी झाल्या आहेत. नंदिनीने २०२३ मध्ये मिस इंडिया किताब जिंकला असून त्या कोटा (राजस्थान) येथील रहिवासी आहेत.