पुणे : प्रतिनिधी
भारत देशाने सा-या विश्वाला संस्कृती, मूल्य, परंपरा, शिक्षण, ज्ञान दिले आहे पण बदलत्या काळात या सर्व बाबी नव्याने संक्रमित करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यंदाचा ब्राह्मण भूषण पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते, इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार युवा उद्योजक निर्मल देशपांडे, डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. किरण कुलकर्णी यांना तर भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेला प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ‘ब्राह्मण रत्ने’ या चरित्रकोश ग्रंथाच्या दुस-या आवृत्तीचे तसेच ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘यशोगाथा – ब्राह्मण स्त्रियांची’ या वंदना धर्माधिकारी लिखित पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुरस्कार प्राप्त पंचांगकर्ते मोहन दाते, कीर्तनकार किरण कुलकर्णी, युवा उद्योजक निर्मल देशपांडे, शुक्ल यजु:शाखीय संस्थेचे जगदीश नगरकर, उद्योजक हृषिकेश कुलकर्णी, सुनंदा निसळ तसेच संपादक भालचंद्र कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे, संचालिका माधुरी कुलकर्णी उपस्थित होते.