सोलापूर / प्रतिनिधी
भारतीय न्याय संहितेमुळे खरोखर न्यायाचे राज्य निर्माण होईल. या नवीन कायद्यामुळे लोकांना जलद न्याय मिळेल.देशाला महान करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असते. शिवाय यासाठी देशाचा मुत्सद्दीपणा महत्वाचा असतो. यामुळेच २६/११ च्या हल्ल्यानंतर आपल्याकडे एकही असा हल्ला झाला नाही.
यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. असे आवाहन पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांनी केले. प्रबोधन मंच व अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अधिवक्ता परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, शहराध्यक्ष महेश अग्रवाल, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव अॅड. लक्ष्मण गवई हे मंचावर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. कायद्यातील बदल हे सर्व नागरिकांसाठी महत्वाचे आहे. भारतीय न्याय संहितेमुळे खरोखर न्यायाचे राज्य निर्माण होईल, नवीन कायद्यामुळे लोकांना जलद न्याय मिळेल. भारताला श्रेष्ठच नाही तर अव्वल दर्जाचे बनवण्यासाठी आपल्या पाल्यांना घडवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. आपले विचार मुलांवर न लादता त्यांना पटवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय माने, सूत्रसंचालन अॅड. मयुरेश शिंदे- देशमुख तर आभार प्रदर्शन महेश अग्रवाल यांनी केले