नाशिक : प्रतिनिधी
हनुमान जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध सोहळे सुरू असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधून एक चिंताजनक बातमी समोर आली. नाशिक जिल्ह्यात असणा-या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली.
मधमाश्यांच्या या हल्ल्यात ७० ते ८० भाविक जखमी झाले असून जखमींचा आकडा मोठा असल्याचे प्रथमदर्शनींकडून सांगण्यात येत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्यामुळे तिथे काही कळायच्या आतच प्रचंड पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक अंजनेरी पर्वतावर येतात. यंदाच्या वर्षीसुद्धा या खास दिवसानिमित्त मंदिराबाहेरील परिसरामध्ये भाविकांची ये-जा पाहायला मिळाली. त्यातच मधमाश्यांच्या या हल्ल्यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. जे भाविक या हल्ल्यात जखमी झाले त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. नाशिकमध्ये अनेक भाविकांची श्रद्धा असणा-या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीच्या निमित्ताने मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.