32.9 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रभिवंडीत अग्नितांडव; तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक

भिवंडीत अग्नितांडव; तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक

ठाणे : प्रतिनिधी
जिल्ह्यात सतत लागणा-या आगीच्या दुर्घटनांमुळे ज्वालामुखीचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या भिवंडी तालुक्यात अग्नितांडवाचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन गोदामे जळून खाक झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या येवई गावच्या हद्दीत आर. के. लॉजिस्टीक गोदाम संकुलात बॅकारोझ परफ्यूम्स अ‍ॅण्ड ब्युटी प्रोडक्टस् प्रा. ली., इन्टरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा. ली, फ्रेगरन्स शॉप प्रा. लि या तीन कंपन्यांची गोदामे आहेत. या गोदामांत मोठ्या प्रमाणात परफ्यूमचा साठा करून ठेवला होता. त्यातच (१९ फ्रेबुवारी) आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास अचानक एका गोदामाला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग पसरत जवळच्या गोदामांना लागली. या आगीच्या कचाट्यात सापडल्याने तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आग विझविण्याकरिता लागले ७ तास
आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. परफ्यूमच्या साठ्यामुळे आग अधिकच भडकत होती. सध्या, घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे ७ तास लागल्याची माहितीही त्यांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR